पुणे। जीओजी एफसीसी आणि जाएंटस संघांनी सातत्यपूर्ण कामगिरी दाखवत येथे सुरू असलेल्या सिटी कप २०२१ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सिटी एफ.सी. पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सामने त्यांच्याच मोशी येथील सिटी फुटबॉल अरेनावर सुरू आहेत.
कार्तिक राजूच्या हॅट्रिकने जीओजी संघाने डायानामाईटसचा ४-० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जाएंटसने अनुभवी गनर्स संघाचा ३-२ असा पराभव केला.
कार्तिक राजूने आठव्याच मिनिटाला जीओजी संघाला आघाडीवर नेले. पण, त्यानंतर विश्रांतीपर्यंत म्हणजे मध्यांतराला त्यांना त्याच एकमात्र गोलच्या आघाडीवर समाधान मानावे लागले होते. उत्तरार्धात मात्र त्यांनी वेगवान खेळ केला. कार्तिकनेत ४८व्या मिनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर ५५व्या मिनिटाला राहुल परदेशीने संघाची आघाडी वाढवली. पुढे ५९व्या मिनिटाला कार्तिकने वैयक्तिक तिसरा गोल करताना संघाचा मोठा विजय साकारला.
त्यापूर्वी झालेल्या सामन्यात जाएंटस संघाने पिछाडीवरून येत गनर्सचे आव्हान मोडून काढले. वेगवान सुरवात झालेल्या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला अझिम मुल्लाने गनर्सला आघाडीवर नेले. सुरवातीलाच गोल केल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या गनर्स संघाने धडाधड आक्रमण करण्यास सुरवात केली. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला अझिमनेच त्यांना दुसरे यश मिळवून देताना आघाडी २-० अशी वाढवली. मध्यंतरापूर्वी ३०व्या मिनिटाला अन्शुल शर्माने गोल करून गोलफरक २-१ असा कमी केला. मध्यंतराला याच स्थितीत सामना थांबला होता.
उत्तरार्धाच्या प्रारंभीच तीन मिनिटात दोन गोल करून जाएंटसने आपली आघाडी भक्कम केली. सामन्यात ४३ आणि ४६व्या मिनिटाला हे गोल स्मितेश पवार याने केले.
शनिवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत केपी इलेव्हन वि. स्निग्मय एफ.सी.ही लढत दु.२ वाजता, तर दुसरी जाएंटस वि. जीओजी एफसीसी लढत दु.३.४५ मिनिटांनी होईल.
निकाल –
जाएंटस ३ (अन्शुल शर्मा ३०वे, स्मितेश ४३, ३६वे मिनिट) वि.वि. गनर्स २ (अझिम काझी २रे आणि १०वे मिनिट)
जीओजी एफसीसी ४ (कार्तिक राजू ८वे, ४८वे, ५९वे , राहुल परदेशी ५५वे मिनिट) वि.वि. डायनामाईटस ०