कर्नल सीके नायडू हे नाव भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अगदी ओळखीचं नाव आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिले कर्णधार म्हणून कर्नल सीके नायडू यांचा उल्लेख केला जातो. बीसीसीआय आपल्या वार्षिक पुरस्कारांत सीके नायडू यांच्या नावे ‘जीवन गौरव पुरस्कार’ देत असते. त्याच कर्नल सीके नायडूंच्या एका कारनाम्याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कर्नल भारतीय क्रिकेट वर्तुळात षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होते. भारताला अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा दर्जा मिळण्याआधी, इंग्रजांनी भारतात क्रिकेट चांगले सुरू झाले होते. सीके नायडू होळकर संस्थानाच्या सैन्यात कर्नल पदावर असल्याने, ते इंग्रजांसोबत क्रिकेट खेळत.
१९२७ मध्ये, एमसीसी संघाविरुद्ध बॉम्बे जिमखाना मैदानावर अवघ्या १०० मिनिटात १५३ धावांची खेळी त्यांनी केली होती. त्यामध्ये ११ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्यांच्या या षटकार मारण्याच्या शैलीवर इंग्रज अधिकारी देखील खुश होते.
१९३२ साली, भारत आपली पहिली-वहिली कसोटी खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. कर्णधारपद कर्नल यांच्याकडे होते. तेव्हा, कर्नल यांच्या फलंदाजी बद्दल इंग्लंडमध्ये खूप चर्चा होती. इंग्लंडचे रहिवाशी देखील कर्नल यांचा खेळ पाहण्यात उत्सुक होते. त्या दौऱ्यावर खेळली गेलेली एकमेव कसोटी भारताने गमावली.
त्या संपूर्ण दौऱ्यावर भारत ३७ सामने खेळला. त्यापैकी २६ सामने हे प्रथमश्रेणी दर्जाचे होते. भारताने ९ सामने जिंकले. तर, ९ सामने अनिर्णीत राहिले. ८ सामन्यात भारताचा पराभव झाला. सीके नायडू यांनी संपूर्ण दौरा गाजवला. सर्वच्या सर्व २६ प्रथमश्रेणी सामने खेळताना त्यांनी १६१८ धावा काढल्या. यात ५ शतकांचा देखील समावेश होता. त्यांची सरासरी ४०.४५ अशी होती.
असाच एक प्रथमश्रेणी सामना, ३-५ ऑगस्टदरम्यान एजबॅस्टनच्या मैदानावर वाॅर्विकशायर संघाविरुद्ध होता. आधीच्या दोन सामन्यात भारताने स्कॉटलंड व ग्लॅमॉर्गन संघांना हरवले होते. भारतीय संघ आत्मविश्वासाने भरला होता. वाॅर्विकशायर विरुद्ध नाणेफेक जिंकून कर्णधार नायडू यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
भारताने पहिल्या डावात २८८ धावा उभारल्या. नुमल जावमल यांनी ७२ तर अमरसिंग यांनी ५७ धावांचे योगदान दिले. वाॅर्विकशायरने भारताला चोख प्रत्युत्तर दिले. कर्णधार रॉबर्ट वेट, नॉर्मन किलनर व जॉन पार्सन यांनी अर्धशतके झळकवत संघाची धावसंख्या ३५४ इतकी केली. यजमानांना ७२ धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या दिवशीच्या, राहिलेल्या वेळात भारताचे ९१ धावांवर ७ गडी बाद झाल्याने भारत पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता.
अखेरच्या दिवशी, नरिमन मार्शल यांच्यासह भारतीय कर्णधार सीके नायडू यांनी वाॅर्विकशायरच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. गगनभेदी षटकार मारण्याची क्षमता असलेला खेळाडू, म्हणून नाव झालेले कर्नल नायडू, यांनी वाॅर्विकशायर विरुद्ध आपल्या या कलेचे उत्तम सादरीकरण केले. कर्नल यांनी पुढाकार घेत वेगवान १६२ धावा केल्या. मार्शल यांच्याबरोबर ८ व्या विकेटसाठी २१७ धावांची भागीदारी केली. भारताने डाव घोषित करण्यापूर्वी नरीमन नावाच्या ९ व्या क्रमांकावरील फलंदाजाने देखील नाबाद १०२ धावांची खेळी केली. तो सामना अनिर्णीत राहिला.
कर्नल नायडू यांनी त्या खेळीमध्ये ६ षटकार लगावले. मात्र, त्यापैकी एक षटकार हा ऐतिहासिक होता. हाल जेरेट या फिरकी गोलंदाजाने भारताचे चार गडी बाद केले होते. नायडू यांच्यासमोर तो पव्हेलियन एंडने गोलंदाजीसाठी आला. नायडू यांनी जेरेट यांना स्क्वेअर लेग वरून षटकार लगावला. तो षटकार स्टेडियम नाही तर स्टेडियमच्या बाहेरून वाहणाऱ्या रीआ नदीला पार करून दुसऱ्या बाजूला पडला.
रीआ नदी ही त्यावेळच्या वाॅर्विकशायर व वॉर्सेस्टरशायरमधील नैसर्गिक सीमा होती. अशाप्रकारे, नायडू यांनी चेंडू एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात मारला होता. त्यावेळचे, स्थानिक लोक सांगतात, तो चेंडू नदीत जरी पडला असता तरी वॉर्सेस्टरशायरमध्येच गेला असे मानले गेले असते. शेवटी, जेरेट यांनीच नायडू यांची ती खेळी संपुष्टात आणली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचनीय-
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…