पुणे । टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या निमित्त जगजेत्ते खेळाडू या ठिकाणी आले आहेत. या स्पर्धेपासून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे-बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र या एटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार सर्वश्री लक्ष्मण जगताप, संजय उर्फ बाळा भेगडे, भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव,पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, सकाळ समूहाचे अभिजीत पवार उपस्थित होते.
पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील नामांकीत खेळाडू या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे टेनिसप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. तसेच या निमित्त जगजेत्त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. त्यातून ते निश्चित प्रेरणा घेतील. अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन होण्याची आवश्यकता असून या टेनिस मैदानातून भविष्यातील चॅम्पिअन निर्माण होतील,आसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आकाशात फुगे सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केलेले टेनिस बॉल त्यांनी टेनिस रॅकेटने प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने भिरकवले. मुख्य स्पर्धेच्यापूर्वी जगातील चौथ्या मानांकीत केरोलीना मेरिन, अभिनेत्री तापसी पन्नू,टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. त्यानंतर भारताचा अव्वल खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरण आणि अमेरिकेच्या मायकेल मोह यांच्यात पहिला सामना झाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात थांबून सामन्याचा आनंद घेतला.