पाकिस्तानचा संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळविला. मात्र या विजयाने खेळाडूंनी हुरळून जाऊ नये असा सल्ला पाकिस्तानचे प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी खेळाडूंना दिला.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पाकिस्तानचा संघ आघाडीवर असला तरी अतिआत्मविश्वासाने खेळाडूंचा घात करू नये, असे मिसबाह यांना वाटते. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून रावळपिंडी येथील मैदानावर सुरुवात होईल.
“हा विजय महत्वपूर्ण होता”
पाकिस्तानचा संघ पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीला पिछाडीवर होता. मात्र त्यांनतर त्यांनी शानदार पुनरागमन करत सामना जिंकण्यात यश मिळवले. या विजयात त्यांचे फिरकीपटू यासिर शहा आणि नौमान अली यांचा मोठा वाट होता. या विजयाबाबत बोलताना मिसबाह म्हणाले, “हा विजय आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होता. संघाने अवघड परिस्थतीतून जात पुनरागमन केले. हे कौतुकास्पद आहे.”
पुढे ते म्हणाले, “मात्र या विजयाने आम्ही हुरळून जाऊ नये. दक्षिण आफ्रिका एक अव्वल दर्जाचा संघ आहे. आणि ते कधीही पुनरागमन करू शकतात, याची आम्हाला जाणीव आहे.”
दुसऱ्या कसोटीबाबत बोलताना मिसबाह म्हणाले, “माझे पूर्ण लक्ष या मालिकेवर केंद्रित झाले आहे. पुढच्या कसोटी सामन्यात आम्ही संपूर्ण क्षमतेने झोकून देत खेळ करू आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. ज्या गोष्टी आमच्या हातात नाही, त्याच आम्ही आत्ता फार विचार नाही करत आहोत.”
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर झाली होती टीका
या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-० ने पराभूत झाला होता. या पराभवानंतर मिसबाह उल हक आणि दुसरे प्रशिक्षक वकार युनुस यांच्यावर जहरी टीका झाली होती. प्रशिक्षक बदलण्याची मागणीही पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात केली जात होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांना कायम ठेवण्यात आले. परंतु, या मालिकेतील निकालाचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंड भारतात एकही कसोटी जिंकणार नाही, भारतीय दिग्गजाचे खळबळजनक विधान
रवी शास्त्री यांनी भारतीय संघात, रमीज राजा यांचे मोठे वक्तव्य
आरंभ है प्रचंड! भारतीय संघाचे खेळाडू उतरले चेपॉकच्या मैदानात, पाहा फोटो