मुंबई । अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक नूर मोहम्मद लालाईवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूला सामना निश्चित करण्यासाठी ऑफर दिल्याबद्दल नूर मोहम्मद दोषी आढळला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अशी माहिती दिली की, प्रशिक्षक नूर मोहम्मदने त्या खेळाडूला शापगीजा क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंग करण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी झालेल्या शापीजा क्रिकेट लीगदरम्यान, काही सामन्यांत आंतरराष्ट्रीय खेळाडूला स्पॉट फिक्सिंगची ऑफर देण्यात आल्याची बातमी मिळाली होती. आता या प्रकरणात नूर मोहम्मद दोषी आढळला आहे.
प्रशिक्षक नूर मोहम्मद यांचे सत्य आले समोर
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ एंटी करप्शन मॅनेजर सय्यद अन्वर शाह कुरेशी यांनी माध्यमांना सांगितले की, “हे एक मोठे दुर्दैव आहे की, अशा मोठ्या स्पर्धेत स्थानिक प्रशिक्षक स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील होता. हा प्रशिक्षक एक एजंट म्हणून काम करत होता, ज्याचे काम एसएलसी 2019 च्या काही सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग करणे होते. सुदैवाने या कामात नूर मोहम्मद अपयशी ठरला.”
”खेळाडूने उत्तम धाडस व व्यावसायिक दृष्टीकोन दाखविला. नूर मोहम्मदच्या या कृत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्या खेळाडूचे मी आभार मानतो. त्या खेळाडूने नूर मोहम्मदची ऑफर नाकारली आणि आमच्या तपासणीत त्याने मदत केली,” असेही कुरेशी यांनी सांगितले.
नूर मोहम्मद सहायक प्रशिक्षक होता
नूर मोहम्मद हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पहात होते. नूर मोहम्मद हे कपिसा संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होता. तसेच तो हमपालाना प्रायवेट क्रिकेट अकादमीचा मुख्य प्रशिक्षकही होता.