श्रीलंका दौऱ्यावर भारताने युवा शिलेदारांचा संघ पाठवला होता. परंतु प्रत्येकाला हा संघ एकदिवसीय आणि टी२० मालिका जिंकेल अशी अपेक्षा होती. भारताने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. पण त्यांना टी२० मालिकेत १-२ ने पराभव पत्करावा लागला. टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. मात्र खराब फलंदाजीमुळे शेवटचे दोन टी२० सामने भारतीय संघाने गमावले. या मागचे प्रमुख कारण म्हणजे, संघातील अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यासह त्याच्या संपर्कात आलेल्या ८ प्रमुख खेळाडूंना अखेरचे २ टी२० सामने खेळता आले नव्हते.
परंतु यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचा त्या ८ खेळाडूंमध्ये समावेश नसल्यामुळे त्याला संपूर्ण टी२० मालिका खेळत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती.
आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सॅमसनला टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा मोठा दावेदार मानले जात होते. पण सॅमसन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात फ्लॉप ठरला. श्रीलंका विरुद्ध मालिका संपल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने असे म्हटले की, संजू सॅमसन जेव्हा या मालिकेतील सर्व सामने पहिल तेव्हा त्याला खूप वाईट वाटेल.
राहुल द्रविड म्हणाले की, ‘खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी सोपी नव्हती. सॅमसनने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६ धावा केल्या होत्या. पहिल्या टी२० मध्येही त्याने चांगली फलंदाजी केली. पण शेवटच्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजी करणे त्याला कठीण गेले. त्यामुळे जेव्हा तो या मालिकेकडे मागे वळून पाहिले तर तो नक्कीच निराश होईल. संजू सॅमसनप्रमाणेच संघातील इतर खेळाडूही खूप प्रतिभावान आहेत. त्यांना सर्वांना संधीसाठी संयम बाळगावा लागेल.’
संजू सॅमसनची खराब कामगिरी
संजू सॅमसनने श्रीलंकेविरुद्ध ३ टी२० सामन्यात फक्त ३४ धावा केल्या आहेत. सॅमसन तिसऱ्या टी२० मध्ये ० वर बाद झाला होता. मोठमोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा सॅमसन श्रीलंकेच्या फिरकीपटूंच्या विरोधात खेळू शकला नाही.
प्रशिक्षक राहुल द्रविड याबद्दल म्हणाले की, ‘फलंदाजांच्या कामगिरीमुळे मी निराश नाही. कारण ते अजूनही युवा खेळाडू आहेत. जेव्हा ते अशा कठीण परिस्थितीत चांगल्या गोलंदाजीला सामोरे जातील, तेव्हाच ते सर्वजण शिकू शकतील. श्रीलंकेची गोलंदाजी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे.’ भारतासाठी १० टी२० सामने खेळणाऱ्या संजू सॅमसनने फक्त ११.७० च्या सरासरीने ११७ धावा केल्या आहेत. ही कामगिरी पाहून, हे स्पष्ट आहे की संजू सॅमसनला टी२० विश्वचषक संघात स्थान मिळणे अशक्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नवीन जबाबदारी! ८० च्या दशकात २४७ विकेट्स घेणारा भारतीय दिग्गज बनलाय ‘या’ संघाचा मुख्य प्रशिक्षक
पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा
बॉस, है हुकुम का इक्का…! कोलंबो विमानतळावर धवन, भुवी अन् चाहरची ‘स्टायलिश एंट्री’, बघा व्हिडिओ