‘तोच दिवस, तेच मैदान आणि तोच संघ…’ रवी शास्त्री ३९ वर्षांपूर्वीच्या त्या आठवणींमुळे झाले भावूक

आजपासून (21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZVsInd) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री येथे पोहोचताच भावनिक झाले.

यासंदर्भात काल शास्त्रींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकांउटवर ट्विट करत यामागील कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘हे तेच मैदान, तोच संघ आणि तेच शहर आहे जिथे 1981मध्ये मी माझ्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती.’

अनेक वर्षांपासून मैदानात तशाच असणाऱ्या लाकडी बेंच आणि पांढऱ्या ग्रिलच्या सीमारेषांसह आपला फोटो शेअर करत शास्त्रींनी ट्विट केले आहे की, ‘इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. हे अविश्वसनीय असेल. उद्या तोच दिवस, तेच मैदान, तोच संघ आणि तेच शहर असेल जिथे मी 39 वर्षांपूर्वी पहिला कसोटी सामना खेळला होता. याबरोबरच ड्रेसिंग रूमही बदलली नाही, आताही तीच आहे.’ असेही ते पुढे म्हणाले.

याबरोबरच त्यांनी एक रोमांचक खूलासा केला. त्यांनी सांगितले की, “आताचा कसोटी सामना 21-25 फेब्रुवारी दरम्यान खेळला जात आहे. हीच वेळ त्यावेळच्या सामन्याचीही होती.”

शास्त्रींनी भारताकडून 21 ते 25 फेब्रुवारी 1981 ला वेलिंगटनला झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने बीसीसीआय टीव्हीसाठी शास्त्रींची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी 1981मध्ये सामन्याच्या 1 दिवसाआधी रात्री येथे आलो होतो. संघ दुतावासाच्या कार्यक्रमाला गेला होता पण, मी थेट हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यावेळी माझे रूम पार्टनर दिलीप वेंगसरकर होते. तेही कार्यक्रमाला गेले असल्याने मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी संघाचे कर्णधार सुनील गावसकर यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.” असेही पुढे ते म्हणाले.

मुळात शास्त्रींना त्यावेळी पर्यायी खेळाडू म्हणून संघात घेण्यात आले होते. भारतीय संघातील फलंदाज दिलीप दोशी यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दुखापत झाल्याने शास्त्रींना संघात घेण्यात आले होते. त्यापूर्वी शास्त्री रणजी ट्रॉफीतील उपांत्यपुर्व सामन्यात खेळत होते.

1981मधील न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला कसोटी सामना यजमान न्यूझीलंडने 62 धावांनी जिंकला होता. पण या सामन्यात शास्त्रींनी चांगली कामगिरी केली होती. त्यांनी दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 22 धावा केल्या होत्या.

त्यानंतर शास्त्रींनी एकूण 80 कसोटी सामने खेळले. यावेळी त्यांनी 11 शतकांसह 3830 धावा बनवल्या. तर 151 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर एकूण 150 वनडे सामने खेळताना 3108 धावा केल्या. यात 4 शतकांचा समावेश होता. तसेच 129 विकेट्सही घेतल्या.

You might also like