सध्या भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत असून संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील सध्या इंग्लंडमध्ये आहेत. दरम्यान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण दिसून येत आहेत. अरुण हे थ्रोडाऊन स्पेशलिस्ट दयानंद गरानीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपला जवळचा मित्र परतल्यानंतर त्याच्यासोबतची सेल्फी पोस्ट करत लिहिले की, ‘माझा उजवा हात परत आला. त्याची कोरोना चाचणी नकारात्मक आढळली असूनही, तो १० दिवस विलगिकरणात राहून अजून तंदुरुस्त आणि मजबूत दिसत आहे. हे विलगीकरणाचे नियम खूपच निराश करणारे आहेत. खरे तर कोरोना लसीकरणावेळी देण्यात आलेल्या दोन लसींवर विश्वास ठेवला गेला पाहिजे.’
मागील काही दिवसांपूर्वी यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाउन स्पेशलिस्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर या दोघांनाही लंडनमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आले होते. दयानंद यांच्या संपर्कात आलेले अभिमन्यू ईश्वर, रिद्धीमान साहा आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना देखील विलगिकरणात ठेवण्यात आले होते.
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1418908421059907591?s=20
जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि सर्व सहाय्यक अधिकारी यांना जवळ जवळ ३ आठवड्यांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी संपल्यानंतर भारतीय संघाने डरहॅम येथे एकत्र येऊन सराव सुरू केला आणि त्यानंतर काउंटी सिलेक्ट इलेवन विरुद्ध रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सराव सामना खेळला आहे. त्याच बरोबर या संघामध्ये विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सहभागी नव्हते.
याच दरम्यान भारतीय संघातील ३ खेळाडूंना दुखापत झाल्या आहेत. यामध्ये शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांचा समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. भारत आणि इंग्लंड संघात ४ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेले ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटर
इंग्लंडमध्ये भारतीय जेमिमाचं वादळ! अवघ्या १०० चेंडूंच्या सामन्यात १७ चौकारांसह ठोकल्या नाबाद ९२ धावा






