आयपीएलचा युएईमध्ये आयोजित केला गेलेला तेरावा हंगाम चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठी अतिशय निराशाजनक ठरला होता. आयपीएलचा सर्वाधिक यशस्वी संघ असे बिरुद मिरवणाऱ्या चेन्नईला मागील हंगामात बाद फेरी गाठण्यात देखील अपयश आले होते. त्यामुळे येत्या हंगामात संघाची पुनर्रचना करत भविष्याच्या दृष्टीने संघबांधणी करण्यात येईल, असे संकेत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने याआधीच दिले होते.
त्याच अनुषंगाने येत्या हंगामासाठी प्रतिभाशाली युवा खेळाडूंवर नजर असल्याचे चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले. न्यूझीलंडचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज टीम सेफर्टला आगामी काळात संघात सामील केले जाईल, असे संकेत स्टीफन फ्लेमिंग यांनी दिले आहेत.
पाकिस्तानविरुद्ध झळकाविले दमदार अर्धशतक
न्यूझीलंडचा युवा फलंदाज टीम सेफर्टने पाकिस्तान संघाविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यात दमदार अर्धशतक लगावले. सलामीला येत सेफर्टने ६३ चेंडूत ८४ धावांची आक्रमक खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकरांची आतिषबाजी केली. त्याच्या अर्धशतकाला केन विलियम्सनची सुयोग्य साथ मिळाल्याने न्यूझीलंडने पाकिस्तानचा ९ गडी राखून सहज पराभव केला.
सेफर्टच्या या खेळीमुळे न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग प्रभावित झाला. सेफर्टच्या या खेळीदरम्यान समालोचन करत असताना फ्लेमिंग म्हणाला, “आयपीएलमध्ये एक पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून खेळणारा संघ आहे. त्या संघाचे याच्यावर नक्कीच लक्ष असेल. तिथे फक्त ब्रेन्डनचाच संघ नाही.” फ्लेमिंगसह समालोचन कक्षात उपस्थित असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षक ब्रेन्डन मॅक्क्युलमने देखील फ्लेमिंगच्या या गमतीशीर टिप्पणीला प्रत्युत्तर दिले.
सेफर्टचे कौतुक करताना मॅक्क्युलम म्हणाला, “सेफर्ट सोबत मी त्याच्या तंत्रावर काम केले आहे. काही लोक असे असतात ज्यांना शिकण्याची इच्छा असते आणि काही लोक स्वतःहून पुढाकार घेऊन शिकण्याची इच्छा प्रकट करतात. त्याला त्याच्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी मदत हवी होती आणि सुदैवाने मी त्या काळात मोकळा असल्याने आम्ही ५-६ महिने त्यांच्या फलंदाजीवर मेहनत घेतली. त्या काळात सेफर्टचे मी जवळून निरीक्षण केले, आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीने मी खुश झालो आहे. त्याच्याकडे गोष्टी लवकर आत्मसात करण्याची कला आहे, जी अभावाने दिसून येते. दिवसेंदिवस त्याच्या फलंदाजीतच नव्हे, तर त्याच्या यष्टीरक्षणातही सुधारणा दिसून येते आहे. लवकरच संपूर्ण जगाला त्याच्या प्रतिभेचा प्रत्यय येईल.”
आयपीएलच्या येत्या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होण्याची शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या ऑक्शनद्वारे अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी सगळेच संघ प्रयत्न करतील. त्यामुळे न्यूझीलंडचा युवा फलंदाज टीम सेफर्टचे स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रेन्डन मॅक्क्युलम यांनी भरभरून कौतुक केल्याने त्याला आगामी काळात चेन्नई अथवा कोलकाता संघाकडून संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
– IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीच्या मॅन ऑफ द मॅचला मिळणार खास मुलाग मेडल; जाणून घ्या मेडलची विशेषता
– भारताला कोहली आणि पुजाराचे अपयश भोवले, ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा