चाहत्यांना कोणत्याही खेळाचा आत्मा असे म्हटले जाते. त्यातही क्रिकेटचे चाहते हे खूपच भावनिक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातही आशिया खंडातील क्रिकेट चाहते जगभरात कोठेही क्रिकेटचा सामना असला तरी आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येतात. अशाच एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याची एक छबी गेल्या दोन वर्षांपासून अनेक प्रसंगावेळी मीम म्हणून वापरली जाते. २०१९ क्रिकेट विश्वचषकावेळी व्हायरल झालेल्या व्यक्तीचे आयुष्य त्या दिवसानंतर अनेक अर्थाने बदलल्याचे दिसत आहे.
तो व्यक्ती बनला मीम मटेरियल
इंग्लंडमध्ये २०१९ साली क्रिकेटचा वनडे विश्वचषक आयोजित केला गेला होता. त्या विश्वचषकातील साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान संघाचा दणदणीत पराभव केला होता. त्या सामन्यावेळी एक पाकिस्तानी चाहता भलताच निराश झाला होता. पराभवाने हातात झालेला हा चाहता कमरेवर हात ठेवून अतिशय उदास नजरेने मैदानामधील सामना पाहताना दिसलेला. कॅमेरामनने टिपलेल्या त्याच्या प्रतिक्रियेची ही छबी अल्पावधीत व्हायरल झालेली व जगभरात प्रत्येक ठिकाणी मीम वापरताना तिचा उपयोग होऊ लागला.
आयुष्यात घडले अनेक बदल
व्हायरल झालेला तो व्यक्ती इंग्लंडमध्ये राहणारा पाकिस्तानी नागरिक सरीम अख्तर हा होय. हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर आपल्या आयुष्यात खूप बदल झाल्याचे सरीम याने एका मुलाखतीत सांगितले, “ज्यावेळी माझे ते छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि माझ्या नावाचा खुलासा झाला, तेव्हापासून माझे जीवन बदलले. मला सोशल मीडियावर हजारो फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. अनेक दिवस माझा फोन सतत खणखणत राहिला. माझी प्रतिक्रिया अशी होती, जी प्रत्येक परिस्थितीत लागू होते. संपूर्ण युरोपमध्ये मी प्रसिद्ध झालो. एकाने मला फोन करून विचारले की, तुमचे छायाचित्र क्रेडिट कार्डवर लावू का जेणेकरून, पैसे खर्च करताना जरासा विचार करता येईल. इतकेच नव्हे तर चक्क कोकाकोला कंपनीने जाहिरातींसाठी माझ्याशी संपर्क केला होता.”
सरीम आता स्वतः स्वतःचे मीम बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनच्या हजरजबाबीपणाने झाली ‘या’ भारतीय गोलंदाजाची बोलती बंद
माजी क्रिकेटपटूने टी२० विश्वचषकासाठी निवडले भारताचे गोलंदाजी आक्रमण, बुमराहसह ‘यांना’ दिली पसंती
व्हिडिओ: डेविड वॉर्नरने पत्नीसह केला भन्नाट डान्स, सहकारी खेळाडूने केली मजेदार कमेंट