तुमचा-आमचा आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेटला जेंटलमन्स गेम म्हणतात, हे आपण जाणतो. अगदी तसंच याच क्रिकेटला आकड्यांचा खेळही म्हणतात. कारण, इतर कोणत्याही खेळांपेक्षा क्रिकेटमध्ये सर्वाधिक आकडेमोड होत असते. प्रत्येक मॅचमध्ये नवनवे रेकॉर्ड होत असतात. मात्र, हे आकडे केवळ विक्रमांसाठीच कामी येतात असे नाही. कधीकधी या आकड्यांमुळे काही असे योगायोग घडून येतात, ज्याची आपल्याला कल्पनाही नसते. क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात घडून आलेल्या अशाच काही दुर्मिळ योगायोगांविषयी माहिती देणारा हा लेख.
ऍलेक स्टुअर्टचे रन्स आणि वाढदिवस…
नव्वदच्या दशकात इंग्लंड क्रिकेट टीमचा प्रमुख आधारस्तंभ असलेला बॅटर म्हणजे ऍलेक स्टुअर्ट. आजही इंग्लंडच्या टॉप फाईव्ह बॅटर्समध्ये त्याचा समावेश होतो. स्टुअर्ट इंग्लंडसाठी 1989 ते 2003 असे पंधरा वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. या काळात त्याने 133 टेस्ट खेळल्या. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 8463 रन्स निघाले. विशेष म्हणजे, त्याचे हे रन्स त्याच्या जन्म तारखेशी मिळतेजुळते आहेत. त्याची जन्मतारीख 8/4/1963 अशी आहे. असा योगायोग इतर कोणत्याही खेळाडूच्या बाबतीत घडला नाही.
भारतीय कर्णधार आणि 183
भारतीय क्रिकेटमधील 183 हा एक विशेष आकडा आहे. 183 रन्सचा बचाव करतच टीम इंडियाने पहिला वर्ल्डकप जिंकलेला. त्याचवेळी तीन भारतीय दिग्गजांची वनडेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली या तिघांच्या करिअरमधील ही सर्वोच्च वनडे इनिंग होती. 183 रन्सची इनिंग खेळल्यानंतर हे तिघेही टीम इंडियाचे कर्णधार झाले. 1999 वनडे वर्ल्डकपमध्ये सौरव गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध ही खेळी केलेली. 2000 मध्ये मॅच फिक्सिंगचा वाद पेटल्यानंतर गांगुली भारतीय कर्णधार बनला. धोनीनेही 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच ही इनिंग खेळलेली. त्यानंतर 2007 पासून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केले, तर विराट कोहलीने 2012 आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ही आपली सर्वोत्तम वनडे इनिंग साकारलेली. पुढे दोन वर्षातच विराटच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी आली.
नेल्सनचा नेल्सन
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान नोव्हेंबर 2011 मध्ये केपटाऊन येथे झालेली पहिली टेस्ट अविस्मरणीय आणि अतिशय मनोरंजक होती. या टेस्टमध्ये अनेक विक्रम मोडले गेलेले. टेस्टच्या एकाच दिवशी दोन इनिंग पाहण्याची आपल्याला सवय आहे, पण या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी चारही इनिंग थोड्या थोड्या पाहायला मिळाल्या. ऑस्ट्रेलियाने आपली पहिली इनिंग दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका 96 रन्सवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि ते फक्त 47 रन्स करू शकले. त्यामुळे दिवसातील उरलेल्या 18 ओव्हरमध्येही दक्षिण आफ्रिकेने बॅटिंग केली.
दुसऱ्या दिवशी असा इतिहास घडल्यानंतर तिसऱ्या दिवशी नेल्सनचाही खास आकडा दिसला. क्रिकेटमध्ये नेल्सन ही संज्ञा तीन किंवा अधिक वेळा एक हा आकडा सलग आल्यास वापरतात. मॅचच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला, अकराव्या नोव्हेंबर महिन्यात आणि 2011 साली, 11 वाजून 11 मिनिटांनी दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 111 रन्सची गरज होती. हा नेल्सनचा महा योगायोग म्हणता येईल.
मायकल क्लार्क + ऍलिस्टर कूक= सचिन तेंडुलकर
भारताच्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम बॅटर मानले जाते. त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. टेस्टमध्ये 15921 वनडेत 18426 रन्स त्याने बनवलेले. दोन्ही प्रकारात मिळून त्याच्या नावे 100 शतके आहेत. सचिन रिटायर झाल्यानंतर 2013 मध्ये त्याच्या बाबतीतील एक योगायोग दिसून आला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मायकल क्लार्क व इंग्लंडचा सर्वकालीन महान बॅटर पर्थ येथे आपल्या करिअरमधील 100वी टेस्ट खेळत होते. त्या टेस्टच्या पहिल्या इनिंगनंतर, कुकने आपल्या टेस्ट करिअरमध्ये 25 शतकांसह 7955 रन्स केलेल्या. त्याचवेळी क्लार्कने 26 टेस्ट शतकांसह 7964 रन्स केलेले. या दोन्ही खेळाडूंचे रन्स एकत्रित केल्यास सचिन इतके 15921 टेस्ट रन्स आणि 51 टेस्ट शतके होतात. त्यामुळे एकटा सचिन दोन दिग्गजांना भारी असं म्हटलं जातं.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत
जन्माने आयरिश असलेला पठ्ठ्या फक्त आईमुळे इंग्लंडकडून खेळू शकला, देशाच्याच भल्यासाठी सोडलं क्रिकेट