---Advertisement---

ठरलं तर! कॉमनवेल्थच्या सेमी फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाशी भिडणार भारत, जाणून घ्या तारिख आणि वेळ

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 8:52 AM
Team India
---Advertisement---

गुरुवारी (०४ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात शेवटचा साखळी फेरी सामना झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांनी अगोदरच उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. परंतु या सामना विजयासह कोणता संघ उपांत्य फेरीत कोणाशी भिडणार आणि गट ब मधून गुणतालिकेत कोण अव्वलस्थानी राहणार?, हे निश्चित होणार होते. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर ७ विकेट्सने मात केली. यासह उपांत्य सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

कॉमनवेल्थ गेम्समधील (Commonwealth Games 2022) बाराव्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ विकेट्स गमावत ७१ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने ११.४ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर न्यूझीलंडचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. अशाप्रकारे गट ब मधून सर्वाधिक ६ गुणांसह इंग्लंडचा संघ गुणतालिकेत प्रथमस्थानी राहिला. तर पराभवाला सामोरे जावे लागलेल्या न्यूझीलंडला ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

असे रंगणार उपांत्य सामने
आता पहिल्या उपांत्य सामन्यात गट अ मधून प्रथम स्थानी राहणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना गट ब मधील दुसऱ्या स्थानी राहणाऱ्या न्यूझीलंड संघासोबत होईल. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात गट अ मधून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहणारा भारतीय संघ गट ब मधील अव्वलस्थानी राहणाऱ्या इंग्लंड संघासोबत भिडेल.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (Australia vs New Zealand) संघातील पहिला उपांत्य सामना ६ ऑगस्ट रोजी ऍजबस्टनच्या मैदानावर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर याच दिवशी ऍजबस्टनच्याच मैदानावर रात्री १०.३० वाजता भारत आणि इंग्लंडचे संघ (India vs England) आमने सामने असतील.

शनिवारी उपांत्य फेरी सामन्यात विजय मिळवणारे २ संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतील. तर पराभूत होणारा संघ तिसऱ्या जागेसाठीचा प्लेऑफ सामना खेळेल. हे सामने रविवारी (०७ ऑगस्ट) होतील. तिसऱ्या जागेसाठीचा प्लेऑफ सामना दुपारी २.३० वाजता सुरू होईल. हा सामना जिंकणारा संघ कांस्य पदक पटकावेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला रिकामे हात परत जावे लागेल. त्यानंतर रात्री ९.३० वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकणारा संघ सुवर्ण पदकावर नाव कोरेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला रौप्य पदक मिळेल.

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ च्या उपांत्य फेरी सामन्यांचे वेळापत्रक
६ ऑगस्ट
पहिला उपांत्य सामना- ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड, दुपारी ३.३० वाजता
दुसरा उपांत्य सामना- भारत वि. इंग्लंड, रात्री १०.३० वाजता

७ ऑगस्ट
कांस्य पदकासाठी लढत- दुपारी २.३० वाजता
सुवर्ण पदकासाठी लढत- रात्री ९.३० वाजता

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---