क्रिकेटटॉप बातम्या

गोष्ट एका क्रिकेटरची भाग 19: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद

कपिल देव यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात म्हणजेच 1994 ला एका उंच सडपातळ बांध्याच्या मध्यमगती वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात प्रवेश झाला. त्याने त्याच्या कारकिर्दीत काही असे क्षण भारतीय चाहत्यांना दिले, जे ते कधीच विसरु शकणार नाही. त्याच्यातील आणि पाकिस्तान संघात काय वाकडे होते हे माहित नाही, पण जेव्हाही तो त्यांच्याविरुद्ध खेळायचा तेव्हा त्याची कामगिरी बहरायची. त्याने अन्य कोणत्याही संघांपेक्षा पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाला खूप त्रास दिला. तो गोलंदाज होता वेंकटेश प्रसाद.

कर्नाटकमधील बंगळुरु येथे 5 ऑगस्ट 1970 ला प्रसादचा जन्म झाला. त्याचा जन्म जरी 1970 ला झाला असला तरी काही कारणास्तव त्याची लहानपणापासूनच अधिकृत जन्मतारीख एकवर्ष आधीची म्हणजेच 5 ऑगस्ट 1969 अशी लावण्यात आली. त्यामुळे पुढेही त्याचे 1969 हेच जन्मवर्ष असल्याची नोंद झाली. प्रसाद लहानपणी अभ्यासात व्यवस्थित होता. त्याच्या शाळेत क्रिकेट खेळ खेळला जात नव्हता. क्रिकेट हा तसा महागडा खेळ त्यामुळे शाळेत खेळला जात नव्हता. त्यावेळी प्रसाद शाळेच्या हॉकी संघात होता. तो हॉकी खेळायचा. त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या उंचीमुळे बास्केटबॉल खेळ असेही सांगितले होते. पण त्याला सुरुवातीपासून गोलंदाजीची आवड असल्याने त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले.

तो शाळेत असताना टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. पण नंतर हळूहळू तो लेदर बॉलकडे वळला. सुरुवातीपासूनच वेगवान गोलंदाजी करत असल्याने त्याला टेनिस बॉल ते लेदर बॉलचा प्रवास करताना त्रास झाला नाही. तो कॉलेजमध्ये असताना विद्यापीठाकडून क्रिकेट खेळायला लागला. कॉलेजमध्ये बॅचलर्स डिग्रीला असताना प्रसादला कॅनरा बँकेकडून नोकरीची ऑफर आली. त्यावेळी बँकेत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी जागा रिक्त होती आणि प्रसादने विद्यापीठाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला ही ऑफर देण्यात आली. त्यानेही ती स्विकारली. पुढे प्रसादने 1991 ला केरळच्या विरुद्ध कर्नाटक संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणातच 3 विकेट्स घेतल्या. पुढच्या मोसमात त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही पदार्पण केले.

साल 1991-92 च्या मोसमात त्याने दक्षिण विभागाकडून पहिलाच सामना खेळताना पहिल्याच चेंडूवर विकेट काढत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने देवधर ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाविरुद्ध सुरत येथे 23 चेंडूत 6 विकेट्स घेत लक्षवेधी कामगिरी केली. एवढेच नाही, तर दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने उत्तर विभागविरुद्धच 38 धावांत 7 विकेट्स घेतल्या. 1993-94 च्या मोसमात प्रसादने केरळ विरुद्धच्या सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार कामगरीमुळे अखेर त्याला 1994 ला भारतीय संघात संधी मिळाली. त्यावेळी कपिल देव त्यांच्या निवृत्ती घेण्याच्या टप्प्यात होते, तर संघात जवागल श्रीनाथ आणि मनोज प्रभाकर हे वेगवान गोलंदाज होते. त्यामुळे त्याचा संघातील प्रवेश हा तिसरा गोलंदाज म्हणून झाला. त्याने 2 एप्रिल 1994 ला न्यूझीलंड विरुद्ध ख्राईस्टचर्च येथे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्याला त्या सामन्यात विकेट्स घेण्यात अपयश आले. त्यावेळीचा किस्सा असा की जेव्हा त्याची भारतीय संघात निवड झाली तेव्हा तो पहिल्यांदा न्यूझीलंडला आल्यानंतर त्याची किटबॅग हरवली होती. त्यामुळे त्याने पदार्पणावेळी श्रीनाथचे शुज वापरले होते.

पुढे तो ऑस्ट्रेलिया-एशिया कपमध्येही अपयशी ठरला. पण त्याने त्याच्या 5व्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबईत 36 चेंडूत 3 विकेट्स घेत त्याची दखल घ्यायला लावली. हळू हळू तो भारताच्या वनडे संघात स्थिरावत गेला. याचदरम्यान त्याच्या आयुष्यात जयंती नावाची मुलगी आली. टायटन ब्रँडसाठी काम करणाऱ्या अनिल कुंबळेने तिथेच काम करणाऱ्या जयंतीशी प्रसादची ओळख करुन दिली. प्रसाद तसा मितभाषी आणि थोडा लाजाळू. त्यामुळे त्याच्यापेक्षा 9 वर्षाने मोठ्या असणाऱ्या जयंतीने पुढाकार घेतला. तिनेच त्याला लग्नाची मागणीही घातली. अखेर एप्रिल 1996 ला त्यांनी विवाह केला.

त्याआधी प्रसाद 1996चा विश्वचषक खेळला होता. त्या विश्वचषकात त्याने पाकिस्तान विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात अमिर सोहेलची घेतलेली विकेट प्रसिद्ध आहे. सोहेलने बाद होण्याआधीच्या चेंडूवर चौकार मारला होता आणि प्रसादला ज्या बाजूला चौकार मारला तिकडे बॅट दाखवत डिवचले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याला त्रिफळाचीत केले होते. या सामन्यानंतरच आयसीसीने खेळाडूंसाठी मैदानातील वागणूकीबद्दल नियम आणले. प्रसाद त्यादिवशी सगळ्या भारतीयांसाठी स्टार झाला होता. ही घटना मैदानात घडली असली तरी मैदानाबाहेर प्रसाद आणि सोहेलचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यानंतर कोलकाताला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. खरंतर तो सामनाही पूर्ण झाला नव्हता. पण सामना श्रीलंकेच्या दिशेने जवळजवळ झुकला असल्याचे आणि भारताचा पराभव समोर दिसत असल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती. त्यामुळे सामनाही थांबवण्यात आला आणि त्या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित केले गेले. त्यावेळी त्या सामन्याआधी सगळीकडे पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या कौतुकाचे बॅनर लावलेले होते. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर मात्र त्याच बॅनरला चप्पलांचा हार घातलेला, शेण त्यावर उडवलेले प्रसादने पाहिले आणि त्याला चाहत्यांच्या भावना या एका रात्रीतही बदलू शकतात हा अंदाज त्यादिवशी आला, हे त्याने एका शोमध्ये सांगितले होते.

प्रसादने त्या विश्वचषकात केलेल्या कामगिरीमुळे त्याला 1996च्या इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघातही स्थान देण्यात आले. त्या संघात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांचाही पहिल्यांदाच समावेश झाला होता. प्रसादने त्या दौऱ्यात कमाल केली. त्याने पहिल्याच सामन्यात बर्मिंगहॅमला झालेल्या 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढच्या लॉर्ड्ला झालेल्या सामन्यात त्याने 7 विकेट्स घेत कसोटीत त्याचे नाणे खणखणीत वाजवले. त्या सामन्याचा किस्सा असा की लॉर्डच्या सामन्यात भारताकडून गांगुली आण द्रविडने कसोटी पदार्पण केले होते. लॉर्ड्सच्या मैदानाच एक ऑनर बोर्ड आहे. यावर शतक केलेल्या किंवा एका डावात 5 विकेट घेणाऱ्या खेळाडूचे नाव कोरले जाते. त्यामुळे त्या सामन्याआधी त्या ऑनर बोर्डवर नाव कोरण्याबद्दल द्रविड आणि प्रसादमध्ये चर्चा झाली होती. प्रसादने द्रविडला म्हटल्याप्रमाणे लॉर्ड्सवर पहिल्या डावात 5 विकेट घेत त्या ऑनरबोर्डवर नाव कोरले. त्याने दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेत 7 विकेट्स घेतल्या. प्रसादने त्याची कसोटी पदार्पणाची मालिका गाजवली. त्याने 3 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या.

पुढे प्रसाद कसोटी संघाचाही नियमित सदस्य झाला. त्याची आणि श्रीनाथची जोडी जमली होती. श्रीनाथ त्याचा जूना मित्र होता. त्यामुळे अनेकदा त्यांच्यात एकमेकांच्या गोलंदाजीबद्दलही चर्चा व्हायची. दोघेही कर्नाटक संघाकडून खेळलेले. प्रसादपेक्षा श्रीनाथ थोडा सिनियर होता. प्रसाद इंग्लंडबरोबरच नंतर दक्षिण आफ्रिकेतही यशस्वी ठरला. 1996-97 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने डर्बन कसोटीत 10 विकेट्स घेतल्या. त्यावेळी तो 1956-57 नंतर दक्षिण आफ्रिकत एका सामन्यात 10 विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज ठरला होता. त्या दौऱ्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या.

पण नंतर मधल्या काळात सातत्याने श्रीलंका, भारतातील खेळपट्ट्यावर खेळल्याने त्याचा रिदम बिघडला. पण त्याने या काळात काही महत्त्वाची कामगिरी केली. त्याने 1997 च्या आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध 27 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने 1999 साली चेन्नई येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शून्य धावा देत घेतलेल्या 5 विकेट्स घेतल्या होत्या. या डावात त्याने एकूण 33 धावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र तरीही भारत तो सामना पराभूत झाला होता. त्याच कालावधीत भारतीय संघात अजित आगरकर, झहिर खान, आशिष नेहरा यांचा भारतीय संघात समावेश झाल्याने हळुहळू प्रसादला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश यायला लागलेे. तो 2001 ला त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

प्रसाद तसा स्वभावाने शांत होता. पण त्याला मैदानात त्याच्या भावना व्यक्त केल्याशिवाय रहावायचे नाही. तो म्हणतो, मी जर भावना व्यक्त केल्या नाही, तर माझ्याकडून चांगली कामगिरी होत नाही. एकदा त्याला याचा फटकाही बसला. 1999 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायकल स्लॅटरला 91 धावांवर त्याने जवागल श्रीनाथ करवी झेलबाद केले. त्यावेळी प्रसादने जोरदार सेलिब्रेशन केले. यामध्ये त्याचा फलंदाजाला डिवचण्याचा कोणताही उद्देश नव्हता. मात्र तरीही सामन्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात आला. स्लॅटरनेही नंतर म्हटले होते की प्रसादच  सेलिब्रेशन सहाजिक होतं, आणि त्यामुळे त्याला काही त्रास झाला नव्हता.

प्रसादला 2001 ला अर्जून पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर तो 2003 पर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळला. 2005 ला त्याने वयाच्या 35व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने तो 2006 ला 19 वर्षांखालील विश्वचषकात अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाचाही प्रशिक्षक होता. त्या संघात चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शहाबाज नदीम, पीयुष चावला असे खेळाडू होते. एवढेच नाही 2007 च्या वनडे विश्वचषकानंतर भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षणाची जबाबदारी प्रसादने हाती घेतली. पण 2009 च्या टी२० विश्वचषकात आणि 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला मोठी कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्याला प्रशिक्षकपदावरुन काढून टाकण्यात आले. त्याने पुढे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स संघाबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. 2010ला जेव्हा चेन्नईने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवले तेव्हा तो त्यांचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. आता प्रसाद क्रिकेट प्रशासनातही उतरत आहे. प्रसादची आंतरराष्ट्रीय कारकिर्द छोटी होती. पण त्याने सर्वांना लक्षात राहितील असे अनेक क्षण दिले आणि त्या क्षणांमुळे तोही छोट्या कारकिर्दीतही सर्वांच्याच लक्षात राहिला. प्रसादने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही क्रिकेटमध्ये योगदान देणे सुरु ठेवले आहे.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

Related Articles