नुकताच इंग्लंडचा भारत दौरा संपला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात २८ मार्च रोजी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याने या दौऱ्याचा शेवट झाला. पुणे येथे झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने ७ धावांनी इंग्लंडला चारीमुंड्या चित करत वनडे मालिकेवर नाव कोरले. ही मालिका संपल्यानंतर उभय संघातील खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांनी घरचा रस्ता धरला आहे.
तर आयपीएल २०२१ मध्ये सहभागी असलेले खेळाडू आपापल्या फ्रँचायझीकडे प्रस्थान करत आहेत. अशात भारत-इंग्लंड मालिकेत सामना रेफरी असलेले जवागल श्रीनाथ यांना प्रवासादरम्यान वेगळाच अनुभव आला.
त्याचे झाले असे की, भारत-इंग्लंड वनडे मालिका संपल्यानंतर श्रीनाथ यांनी पुण्यातील विमानतळावरून निघाले. यावेळी इतर क्रिकेटपटूंप्रमाणे चार्टर्ड विमानाने प्रवास न करता त्यांनी साधारण प्रवासी विमानाने जाण्याचा निश्चय केला. या प्रवासादरम्यान त्यांच्या बाजूला काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद बसल्या होत्या.
इतर प्रवास्यांप्रमाणे त्यांनी आपापसात थोडाफार संवाद साधला. पण पूर्ण संवादादरम्यान शमा श्रीनाथ यांना ओखळूच शकल्या नाहीत. अखेर श्रीनाथ यांनी स्वत आपला परिचय करुन दिल्यानंतर त्यांना श्रीनाथ हे माजी भारतीय क्रिकेटपटू असल्याचे कळले.
शमा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘या सदगृहस्थांसोबत मी काही तास विमान प्रवास केला. यादरम्यान आम्ही संवादही साधला. शेवटी मी त्यांना त्यांचे नाव विचारले. यावर त्यांनी आपण जवागल श्रीनाथ असल्याचे सांगितले. त्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करता विचारले असता, आपण क्रिकेट क्षेत्रात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मला त्यांची नक्की ओळख पटली.’
‘या पूर्ण संवादादरम्यान आमच्या चेहऱ्यावर मास्क होते. मास्क असताना तुम्ही एकमेकांना ओळखू शकत नाही,’ असे शमा यांनी पुढे लिहिले आहे.
https://twitter.com/drshamamohd/status/1376437673657786373?s=20
जवागल श्रीनाथ यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २२९ वनडे सामने खेळताना ३१५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ६७ कसोटी सामन्यात २३६ फलंदाजांना बाद केले होते. श्रीनाथ यांना त्यावेळच्या सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये गणले जात असे. २००३ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आयसीसीच्या सामना रेफरीपदाची जबाबदारी स्विकारली.
महत्त्वाच्या बातम्या-
यालाच आम्ही सिंहाची भावना म्हणतो! ‘असे’ केले सीएसकेने सॅम करनच्या अविस्मरणीय खेळीचे कौतुक
राजस्थान रॉयल्ससाठी खुशखबर! आर्चरच्या हाताची झाली सर्जरी, आयपीएल २०२१ मध्ये खेळण्याची शक्यता
“टीम इंडियात जागा मिळत नसताना सूर्यकुमारने स्वत:ला सांभाळले, म्हणून…” दिग्गजाचे मोठे भाष्य






