भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर प्रचंड दबावाखाली आहे. त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली. यानंतर बीसीसीआयनं गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यासोबत एक मॅराथॉन बैठक घेतली. ही बैठक सुमारे सहा तास चालली. या बैठकीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेचा रोडमॅप तयार करण्यात आला.
बीसीसीआयच्या या बैठकीनंतर लगेचच आलेल्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, जर भारतानं ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली नाही, तर बीसीसीआय वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांचा विचार करेल. अशा स्थितीत गंभीर कसोटी प्रशिक्षक राहणार नाही. त्याच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. आता भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी या अहवालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही अफवा असल्याचं म्हटलंय.
आकाश चोप्रा यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, गंभीर आणि कर्णधार रोहित शर्माला या लाजिरवाण्या पराभवासाठी जबाबदार धरलं पाहिजं, परंतु मुख्य प्रशिक्षकपदावर अवघ्या तीन महिन्यांनंतर बदल करणं घाईचं ठरेल. आकाश चोप्रा त्यांच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले, “मला वाटतं ही संपूर्ण अफवा आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियानं चांगली कामगिरी केली नाही तर प्रशिक्षक बदलला जाईल, ही बातमी निराधार वाटते. मला वाटतं की ही थोडी घाई होईल. अशा अफवा दुष्ट हेतूनं पसरवल्या जात आहेत. गंभीरला नुकतेच मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलंय. खेळाडूंनी कामगिरी केली नाही तर प्रशिक्षकाला काढून टाकलं जातं, असं होत नाही. हा मार्ग नाही. मी अशा विचारसरणीशी अजिबात सहमत नाही.”
हेही वाचा –
“न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवासाठी मी जबाबदार”, दिग्गज खेळाडूची धक्कादायक कबूली
पाकिस्ताननं इतिहास रचला! तब्बल इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशात पराभव
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू गुजरातमध्ये जाणार! मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीनं दिले संकेत