-शंतनु कुलकर्णी
इंग्लंडच्या वेस्ट इंडिज, आर्यलॅंड व पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० ला १८ ऑगस्ट २०२० रोजी त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये सुरुवात होणार आहे तर स्पर्धेचा अंतिम सामना १० सप्टेंबर २०२० रोजी खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावेळेस पुर्ण स्पर्धा त्रिनिदाद व टोबॅगोमधील ब्रायन लारा क्रिकेट ऍकॅडमी व क्विन्स पार्क ओव्हल या दोन मैदानावर खेळविण्यात येणार आहे तसेच यावेळेस प्रेक्षकांना मैदानावर सामने पाहण्याता आनंद घेता येणार नाही.
यावेळी जे संघ खेळत आहेत, त्यांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
त्रिनबॅगो नाईट रायडर्स
कर्णधार किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, सुनिल नारायण, कॉलिन मुनरो, डॅरेन ब्राव्हो व लेंडल सिमन्स यांसारख्या तगड्या खेळाडुंचा या संघात भरणा असल्याने त्रिनबॅगो नाईट रायडर्सचा संघ आपले चौथे विजेतेपद पटकावण्यास उत्सुक असेल. यासोबतच टिम सेईफर्ट,फवाद अहमद व सिकंदर रझा चुणुक दाखवण्यास उत्सुक असतील. तसेच प्रविण तांबे हा या यशस्वी संघाचा भाग आहे यासोबतच तो कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये खेळणार पहिला भारतीय खेळाडु बनणार आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा भरणा असल्याने त्रिनबॅगो इतर संघापेक्षा काहीसा वरचढ दिसत आहे.
सर्वोत्तम कामगिरी – २०१५,२०१७ आणि २०१८ (विजेतेपद)
बार्बाडोस ट्रायडेन्ट्स
जेसन होल्डरच्या नेतृत्वात २०१९ चा विजेता ठरलेल्या या संघाला स्पर्धा सुरु होण्यापुर्वी मोठे धक्के बसले आहेत.वहाब रियाज, मार्कस स्टॉयनिस, हॅरी गर्नी, ऍलेक्स हेल्स यांसारखे दिग्गज यावर्षीच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांच्या जागी कोरी ऍडरसन व मिशेल सॅंटनरला संघात समाविष्ट करुन घेतले आहे. त्यामुळे संघाची फलंदाजीची धुरा जॉन्सन चार्ल्स, जोनाथन कार्टर व कोरी अॅडरसनवर तर गोलंदाजीची धुरा राशिद खान, जेसन होल्डर सॅंटनर व हेडन वॉल्श ज्यु वर असेल. २०२० च्या युवा विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या निम यंगवर सर्वांची नजर असेल.
सर्वोत्तम कामगिरी – २०१४ व २०१९ (विजेतेपद)
जमैका थलाईवाज –
कॅरेबियन प्रिमियर लीगच्या पहिल्या ४ सत्रा पैकी दोन मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर जमैकाचा संघ हवी तशी कामगिरी करु शकला नाही.रोमन पॉवेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघात आंद्रे रसेल, कार्लोस ब्राथवेटा यांसारखे तगडे अष्टपैलु खेळाडु आहेत. जमैकाच्या फलंदाजीची कमान ग्लेन फिलिप्स, चाडविक वॉल्टन, रोमन पॉवेल व जेरमिन ब्लॅकवुडवर असेल तर गोलंदाजीची धुरा ओशेन थॉमस, फिडेल एडवर्ड्स, संदिप लामिथाने व मुजिब उर रहेमानवर असेल.
सर्वोत्तम कामगिरी- २०१३ व २०१६ (विजेतेपद)
गयाना अॅमेझॉन वॉरियर्स –
कॅरेबियन प्रिमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक ५ वेळेस गयानाच्या संघाने अंतिम फेरी गाठली आहे पण त्यांना अजुन एकदाही विजेतेपदावर शिक्कामोर्तब करता आहे नाही. त्यांना यावेळेस ते विजेतेपदाचे स्वप्न पुर्ण करतात का हे पाहावे लागेल. अनुभवी शोएब मलिक, शदाब खान व काईस अहमद यावर्षी संघाचा भाग नसतील त्यामुळे रॉस टेलर, ब्रॅंडन किंग, शिमरॉन हेटमायर, निकोल्स पुरन व शर्फेन रुदरफोर्ड वर मोठी जिम्मेदारी असेल. सध्याची निकोल्स पुरनची कामगिरी पाहता पुरनला रोखणे इतर संघाना सोपे नसणार हे मात्र नक्की.
सर्वोत्तम कामगिरी – २०१३,२०१४,२०१६,२०१८,२०१९ (उपविजेतेपद)
सेंट किंट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्स
रयाद इम्रितच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सेंट किंट्स आणि नेव्हिस पॅट्रियॉट्सच्या संघाने २०१७ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते. संघाचा विचार करता या संघात सोहल तन्वीर, शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ, इश सोढी व स्वत: कर्णधार इम्रित सारखी तगडी गोलंदाजांची फळी आहे तर फलंदाजीची धुरा ख्रिस लिन, इविन लुईस, बेन डंक व अनुभवी दिनेश रामदिनवर असेल.
सर्वोत्तम कामगिरी – २०१७ (उपविजेतेपद)
सेंट लुसिया झुक्स
२०१३ पासुन स्पर्धेचा भाग असलेल्या या संघाला आतापर्यंत फक्त एकदा पहिल्या चार संघात स्थान मिळवता आले आहे. त्यात स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच धडाकेबाज गोलंदाज ख्रिस गेलने काही कारणास्तव स्पर्धेतुन माघार घेतली आहे तर रिला रॉसो, कॉलिन इंग्राम हे सुद्धा प्रवास बंदीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे संघाची जिम्मेदारी कर्णधार डॅरेन सॅमी, आंद्रे फ्लेचर, मोहम्मद नबी, रखिम कॉर्नेल व केसरीक विल्यम्सवर असेल. कर्णधार सॅमी अनुभवी खेळाडुंसोबत नवख्या खेळाडुंची कशी मोट बांधतो हे पाहावे लागेल. कमी अनुभवी फलंदाजी संघाच्या कामगिरीवर परिणाम करु शकेल.
सर्वोत्तम कामगिरी – २०१४ (चौथे स्थान)