क्रिकेट सामन्यात खेळाडूंचे असभ्य वर्तन ही काही नवी बाब नाही. अशाच एका काउंटी सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटनने असभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सार्वजनिकरित्या मैदानावर क्रेग ओव्हरटनची ही कृती पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. याआधी त्याला अशाप्रकारे असभ्य वर्तन करताना कधीच पाहिले गेले नव्हते. वॉर्विकशायर आणि सॉमरसेट यांच्यातील या सामन्याच्या ९ व्या षटकात ही घटना घडली, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले.
ओव्हरटनने गमावला संयम
सॉमरसेट कडून खेळणाऱ्या क्रेग ओव्हरटनने ९ व्या षटकात आपला संयम गमावला. वॉर्विकशायरचा फलंदाज विल रोड्सने चेंडू गोलंदाजाच्या दिशेने मारला, तेव्हा ओव्हरटनने रागाने चेंडू पकडला आणि तो फलंदाजाच्या दिशेने परत फेकण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू व्यवस्थित पकडू शकला नाही आणि त्यानंतर त्याने आपली निराशा व्यक्त केली.
या घटनेनंतर क्रेग ओव्हरटनवर जोरदार टीका झाली. वॉर्विकशायरविरुद्ध एजबॅस्टन येथे सॉमरसेटकडून खेळत असताना, ओव्हरटन काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने २२ षटकांत ५७ धावा खर्च केल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. वॉर्विकशायरने चार गड्यांच्या मोबदल्यात २८३ धावा केल्या.
कर्णधाराची खिलाडूवृत्ती
ओव्हरटनच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. दिवसभर मेहनत करूनही विकेट न मिळाल्याची निराशा त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसून येत होती. दिवसाच्या ८५ व्या षटकात ओव्हरटनने मंकडींग पद्धतीने नॉनस्ट्रायकर मॅथ्यू लॅम्बला बाद करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटनने चेंडू सोडला नाही आणि ऍक्शन पूर्ण करण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर फलंदाजाला धावबाद केले. तो ज्या सॉमरसेट संघाचा भाग होता त्या संघाचा कर्णधार टॉम अबेलने हे अपील मागे घेत अत्युच्च दर्जाची खिलाडूवृत्ती दाखवली.