क्रिकेटमध्ये अनेकदा असे होते की एखादा महान खेळाडू चांगला कर्णधार किंवा चांगला प्रशिक्षक बनत नाही. कधीकधी याचे उलट, एखादा साधारण खेळाडू आपल्या प्रशिक्षणाखाली चांगले खेळाडू आणि चांगली टीम तयार करतो.
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, आपण अशाच ४ प्रशिक्षकांविषयी जाणून घेऊयात, जे खेळाडू म्हणून तितकीशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत, परंतु प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपले नाणे खणखणीत वाजवले.
४) जॉन बुकानन ( John Buchanan)
प्रशिक्षकांचे पितामह म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते ऑस्ट्रेलियाचे जॉन बुकानन यांचा या यादीत पहिला क्रमांक लागतो. फक्त ७ प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव आणि १२.३ ची मामुली सरासरी असलेले बुकानन हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. प्राध्यापक म्हणून काम केलेले बुकानन हे १९९९ ते २००७ यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक होते.
या आठ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी ऑस्ट्रेलियाला २००३ व २००७ विश्वचषक स्पर्धांसोबत २००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाने सलग सोळा कसोटी सामन्यातील, विजयाचा भीमपराक्रम देखील बुकानन यांच्याच प्रशिक्षणाखाली केला होता. २००९ च्या आयपीएल हंगामात त्यांनी केकेआरसाठीसुद्धा सेवा दिली. परंतु, यावेळी त्यांच्या हाती अपयश आले.
३) डेव्ह व्हॉटमोर (Dav Whatmore)
यशस्वी प्रशिक्षकांच्या सूचीमध्ये कायम असणारे एक नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचे डेव्ह व्हॉटमोर. ऑस्ट्रेलियासाठी सात कसोटी खेळलेले व्हॉटमोर हे १९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंका संघाचे प्रशिक्षक होते. व्हॉटमोरयांनी आपली बहुतांश प्रशिक्षण कारकीर्द हे आशिया खंडात घालवली. त्यांनी दोन वेगवेगळ्या कालखंडात श्रीलंका संघाला मार्गदर्शन केले. काही काळ बांगलादेश, पाकिस्तान आणि झिंबाब्वे संघाचे हेड कोच होते.
साल २००८ च्या एकोणीस वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाला देखील यांचे मार्गदर्शन लाभले. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गज खेळाडूंना शोधण्याचे श्रेयसुद्धा व्हॉटमोर यांना दिले जाते. भारतातील केरळ क्रिकेट संघटनेसाठी त्यांनी दोन वर्ष काम पाहिले.
२) डंकन फ्लेचर (Duncan Fletcher)
साल २०११ च्या विश्वचषक विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक ‘हायप्रोफाईल कोच’ म्हणून ओळखले जाणारे डंकन फ्लेचर यांनी भारतीय संघाची धुरा आपल्या हाती घेतली. फ्लेचर यांनी झिंबाब्वेकडून फक्त सहा वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले होते.
इंग्लंड क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय फ्लेचर यांना दिले जाते. श्रीलंका, पाकिस्तान, वेस्टइंडीज, न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सलग मालिकांत त्यांनी इंग्लंड संघाला विजय मिळवून दिले. तर २००५ मध्ये तब्बल १८ वर्षानंतर अॅशेस इंग्लंडला मिळवून देण्यात त्यांचे योगदान होते.
त्यांनी भारतीय संघासाठी २०११ ते २०१५ यादरम्यान सेवा दिली. या काळात भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये थोडे पतन झाले. परंतु, वनडे क्रिकेटमध्ये भारत अव्वल राहिला. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय फ्लेचर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम उपलब्धींपैकी एक होता.
१) लालचंद राजपूत (Lalchand Rajput)
भारताकडून दोन कसोटी आणि चार वनडे सामन्यात सहभागी झालेले मुंबईकर लालचंद राजपूत हेदेखील एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. २००७ च्या भारताने जिंकलेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक तसेच मॅनेजर अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी पार पडली होती. आयपीएलच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात राजपूत यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१८ पासून ते झिंबाब्वे राष्ट्रीय संघाचे हेड कोच आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
गुरुपौर्णिमा! आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास
रोहितच्या नावे आहे ‘हा’ लज्जास्पद विक्रम, आणखी एक चूक करेल कसोटी संघातून सुट्टी!
धक्कादायक! नाणेफेकीनंतर घडलं असं काही, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे त्वरित रद्द