2024 हे वर्ष अनेक आंबट-गोड आठवणी घेऊन निघून गेले आहे आणि 2025 हे वर्ष येऊन ठेपले आहे. ज्याचे सर्वांनी दणक्यात स्वागत केले आहे. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2024 मधील टेस्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. विशेष म्हणजे भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्याशिवाय यशस्वी जयस्वालचाही समावेश आहे. केवळ या दोन भारतीय खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यशस्वी जयस्वाल आणि इंग्लंडच्या बेन डकेट यांच्यावर प्लेइंग इलेव्हनच्या सलामीची जबाबदारी सोपवली आहे. 2024 मध्ये, यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने या वर्षात एकूण 1478 धावा केल्या असून त्यात तीन शतकांचा समावेश आहे. त्याने घरच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावली होती. दुसरीकडे, बेन डकेटचेही वर्ष चांगले गेले. त्याने 2024 मध्ये 1189 कसोटी धावा केल्या आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रूक, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि श्रीलंकेचा कमिंडू मेंडिस यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. 2024 साली सर्वाधिक कसोटी धावा करणारा रूट हा फलंदाज होता. मग तो मायदेशात खेळत असो वा परदेशात. त्याने आपले फलंदाजीचे कसब सर्वत्र दाखवले. त्याने 2024 मध्ये एकूण 1556 कसोटी धावा केल्या. न्यूझीलंडने भारतात कसोटी जिंकण्यात रचिन रवींद्रने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या वर्षी त्याने 984 कसोटी धावा केल्या. हॅरी ब्रूक आणि कामिंडू मेंडिस यांनीही चांगला खेळ केला आहे. प्लेइंग इलेव्हनमधील यष्टिरक्षकाची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स कॅरीकडे सोपवण्यात आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे. पर्थ येथे झालेल्या कसोटी सामन्यात तो टीम इंडियाचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 295 धावांनी सामना जिंकला होता. सध्याच्या मालिकेत त्याने आतापर्यंत एकूण 30 कसोटी बळी घेतले आहेत. 2024 मध्ये त्याने एकूण 71 विकेट घेतल्या आहेत.
न्यूझीलंडचा मॅट हेन्री, ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज यांनाही संधी मिळाली आहे. हेझलवूडने ऑस्ट्रेलियासाठी गरज असताना शानदार गोलंदाजी केली असून सध्या तो दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून बाहेर आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडले वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ-
यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, जो रूट, रचिन रवींद्र, हॅरी ब्रूक, कामिंडू मेंडिस, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मॅट हेन्री, जसप्रीत बुमराह (कर्णधार), जोश हेझलवूड आणि केशव महाराज
हेही वाचा-
2025 मध्ये भारताचा पहिला सामना कोणाशी? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार रोहित शर्मा, सिडनी कसोटीनंतर करणार घोषणा?
वेस्ट इंडिजच्या या खेळाडूची आश्चर्यकारक कामगिरी, एकाच चेंडूत दिल्या 15 धावा