गेल्या आठवड्यात एका महिला सहकाऱ्याला अश्लील फोटो आणि अश्लील मेसेज पाठवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्याच्या ऐवजी हे कर्णधारपद पॅट कमिन्सला देण्यात आले आहे. आता कर्णधारपद मिळाल्यानंतर पॅट कमिन्सने एक मोठा खुलासा केला आहे.
येत्या काही दिवसात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ॲशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. हे पद स्वीकारल्यानंतर त्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यामध्ये त्याने खुलासे केले आहेत. त्याला निवड समीतीने त्याचे सर्व रहस्य उघड करण्यास सांगितले होते.
पॅट कमिन्सला जेव्हा विचारण्यात आले होते की, “कर्णधारपद सोपवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या पॅनेलने काही अटी ठेवल्या होत्या का?” याचे उत्तर देत, पॅट कमिन्स म्हणाला की, “काही असे प्रश्न होते, परंतु मी त्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. समितीमध्ये सीएचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली, निवडकर्ता टोनी डोडेमेड, सीए बोर्ड सदस्य मेल जोन्स, सीईओ निक हॉकले आणि अध्यक्ष रिचर्ड फ्रायडेन्स्टीन या पाच सदस्यांनी कर्णधारपदासाठी माझ्या नावाची निवड केली.”
कमिन्सने सांगितले की त्याची निवड समीतीबरोबर उघड चर्चा झाली. तसेच अनेक मुद्द्यांवर स्पष्ट बोलणे झाले.
ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना यावर्षी जास्त कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये, याचा परिणाम ॲशेस मालिकेच्या तयारीवर होणार नसल्याचेही कमिन्सने स्पष्ट केले. जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ व्यतिरिक्त, कमिन्ससह अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी कोविडमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६ महिन्यांहून अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळलेले नाही.
तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी म्हटले की, “वेगवान गोलंदाजांकडून कुठलाही बहाणा ऐकून घेतला जाणार नाही.” ॲशेस मालिकेला ८ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, “कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आमचे सराव सत्र जास्त मोठे नसेल. कारण खेळाडू आता टी२० विश्वचषक खेळून परतले आहेत. त्यांना विलगिकरणात देखील राहावे लागणार आहे. परंतु, मॉडर्न डे क्रिकेटपटूंनी मुख्य बाब म्हणजे कुठल्याही परिस्थितीत स्वतः ला जुळवून घेतलं पाहिजे. आमच्याकडून कुठलेही कारण दिले जाणार नाही. मला खात्री आहे की इंग्लंडचा संघही कोणतीही कसर सोडणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘तिसऱ्या पंचांची खराब पंचगिरी’, यष्टीचीत झालेल्या रॉस टेलर जीवनदान मिळाल्याने भडकले भारतीय चाहते
कानपूर कसोटीची नाट्यमय अखेर! न्यूझीलंडच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ
भारतातील ३ आंतरराष्ट्रीय स्टेडियम ज्यावर गेल्या १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना