क्रिकेट, या खेळाचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. अगदी लहान मुलांपासून सर्वांना क्रिकेटचे साधे-सोपे नियम तोंडपाठ असतात. क्रिकेटचे ३ प्रकार, गोलंदाजीच्या पद्धती, फलंदाजीतील वेगवेगळे फटके आणि बरचं काही. अगदी फलंदाज कशाप्रकारे बाद होतो, हे सुद्धा अनेकांना माहिती असते. यामध्ये त्रिफळाचीत, झेलबाद, धावबाद आणि पायचित, हे फलंदाजांचे बाद होण्याचे साधे आणि नेहमी पाहण्यात आलेले प्रकार आहेत.
परंतु तुम्हाला माहितंय का, फलंदाजाच्या बाद होण्याच्या केवळ इतक्याच पद्धती नसून त्यांची संख्या एकूण १० इतकी आहे. सुरुवातीला क्रिकेटमध्ये एक फलंदाज ११ प्रकारे बाद होऊ शकत असे, परंतु पुढे नियमांमधील संशोधनानंतर यातील एक प्रकारात घट करत त्यांची संख्या १० वर आणण्यात आली आहे. याच प्रकारांचा (Cricket Dismissals) या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. झेलबाद (Catch Out)
जेव्हा चेंडू कोणत्या फलंदाजाच्या बॅटला लागतो आणि तो मैदानावर पडण्याआधी कोणता क्षेत्ररक्षक त्या चेंडूला पकडतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होत असतो. क्रिकेटमध्ये बाद होण्याचा हा खूप सामान्य प्रकार आहे. क्रिकेट इतिहासात ५८.६ टक्के म्हणजे सर्वाधिक वेळा तर फलंदाज याचप्रकारे बाद झाले आहेत. यातील बरेचसे झेल हे यष्टीरक्षकांद्वारे टिपले जातात. ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने ४१७ झेल पकडले होते.
२. त्रिफळाचीत (Bold)
जेव्हा गोलंदाज चेंडू सरळ यष्टीवर मारण्यात यशस्वी होतो, तेव्हा फलंदाज त्रिफळाचीत होतो. यालाच दांड्या उडवणे, बत्त्या गुल करणे असेही संबोधले जाते. हा फलंदाजाने बाद होण्याचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे. क्रिकेट इतिहासातील २१.३ टक्के फलंदाज अशाप्रकारे बाद झाले आहेत.
३. पायचित (LBW)
जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो आणि फलंदाज त्याच्या शरीराच्या मदतीने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी जर तो यष्टीच्या बरोबर पुढे असेल, तर फलंदाज पायचित होत असतो. परंतु यासाठी चेंडू यष्टीच्या दिशेने जाणे गरजेचे असते. तसेच जर चेंडू फलंदाजाच्या शरीराच्या मध्यभागातून न गेल्यास तो सरळ यष्टीला जाऊन लागावा लागतो. याबरोबरच फलंदाजाची बॅट किंवा त्याच्या ग्लोव्ह्जचा कोणताही भाग चेंडूला स्पर्श केलेला नसावा.
क्रिकेटमध्ये १४.४ टक्के फलंदाज याप्रकारे बाद होत असतात. हा फलंदाजाचा बाद होण्याचा सर्वात विवादात्मक प्रकार आहे. परंतु क्रिकेटमधील तांत्रिक सुधारांमुळे आता फलंदाज पायचित होण्याच्या प्रकारावरुन विवाद निर्माण होण्याच्या घटनांमध्ये कमी आली आहे.
४. धावबाद (Run Out)
जेव्हा फलंदाज चेंडूला हिट केल्यानंतर खेळपट्ट्यांच्या मधून धावत असतो आणि तो क्रिजमध्ये पोहोचण्या आत क्षेत्ररक्षक चेंडू अचूक यष्टीला मारतो, तेव्हा फलंदाज धावबाद होत असतो. परंतु ही विकेट गोलंदाजाच्या खात्यात जात नसते. धावबाद होण्याच्या निर्णयांवरुनही बऱ्याचदा वाद होत असतात. अनेकवेळा मैदानी पंचांना याबद्दलचा योग्य निर्णय न घेता आल्याने तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय जातो. ३.४६ टक्के फलंदाज या प्रकारे बाद होत असतात.
५. यष्टीचीत (Stumping)
जेव्हा फलंदाज क्रिजच्या बाहेर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडू बॅटला स्पर्श न करता यष्टीरक्षकाच्या हातात जातो. व तो यष्टीरक्षक त्वरित चेंडू पकडून यष्टीला मारतो, तेव्हा फलंदाज यष्टीचीत होतो. अधिकतर फलंदाज फिरकी गोलंदाजांच्या चेंडूवर अशाप्रकारे बाद होत असतात. फार क्वचितच म्हणजे २.०२ टक्के फलंदाज अशाप्रकारे बाद होताना दिसतात. भारताच्या एमएस धोनीच्या नावे सर्वाधिक १२३ वेळा फलंदाजांना यष्टीचीत करण्याचा विक्रम आहे.
६. हिट विकेट (Hit Wicket)
जेव्हा एखादा फटका मारताना फलंदाजाची बॅट किंवा त्याच्या शरीराचा एखादा भाग यष्टीला लागतो आणि दांड्या उडून पडतात, तेव्हा फलंदाज हिट विकेट होतो. खूपच कमी वेळा अशा विकेट पाहायला मिळतात. अगदी ०.२३० टक्के फलंदाज अशाप्रकारे बाद होतात.
७. क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यास (obstruction in fielding)
जेव्हा कोणता फलंदाज क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाला मुद्दाम अडवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना झेल टिपताना अडथळा निर्माण करतो, तेव्हा त्याला क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्याने बाद दिले जाते. जर फलंदाज मौखिक, सांकेतिक किंवा क्षेत्ररक्षकाच्या मार्गात घुसून त्याच्यासाठी समस्या निर्माण करतो तेव्हा हा नियम लागू होतो. आतापर्यंत केवळ ०.०१ फलंदाज अशाप्रकारे बाद झाले आहेत.
८. दुसऱ्यांदा चेंडूला मारण्यास (On Hitting The Ball Second Time)
जेव्हा कोणता फलंदाज मुद्दाम चेंडूला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला बाद दिले जाऊ शकते. जर चेंडू फलंदाजाच्या बॅट, शरीर किंवा हेल्मेटसारख्या कोणत्या गोष्टीला लागला आणि त्यानंतर त्याने मुद्दाम चेंडूला दुसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पंच त्या फलंजादाला बाद देतात. खूपच क्वचित फलंदाज अशाप्रकारे बाद होतो.
९. टाइम आऊट (Time Out)
एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या नव्या फलंदाजाला ३ मिनिटांच्या आत मैदानात यायचे असते आणि आपल्या जागेवर जाऊन थांबायचे असते. जर एखाद्या फलंदाजाने यापेक्षा जास्त वेळ घेतला, तर त्याला टाइम आऊट दिले जाते. फारच कमी फलंदाज अशाप्रकारे बाद होत असतात. आतापर्यंत फक्त ६ फलंदाज टाइम आऊट झाले आहेत.
१०. रिटायर्ड आऊट (Retired Out)
जेव्हा कोणता फलंदाज पंचांना न सांगता मैदानाबाहेर निघून जातो आणि त्याच्याकडे मैदानाबाहेर जाण्याचे कोणते योग्य कारण नसते, तेव्हा पंच त्याला रिटायर्ड आऊट देऊ शकतात. सहसा सराव सामन्यांमध्ये कोणता फलंदाज चांगली खेळी केल्यानंतर रिटायर होत असतो. जेणेकरुन इतर फलंदाजांना खेळण्याची संधी मिळते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: नॉर्थ ईस्ट युनायडेटविरुद्ध हैदराबाद एफसीचे पारडे जड; अव्वल चौघांत स्थान पटकावण्याची संधी
रोहितने दिले संकेत, ३५ वर्षांचा ‘हा’ गोलंदाज ठरू शकतो भारतीय संघातील हुकमी एक्का






