राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काल (9 जुलै) आधिकृत घोषणा केली. टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा हेडकोचचा पदभार संपला. द्रविडसोबतच त्याचा सपोर्ट स्टाफ विक्रम राठोड, पारस म्हांबरे आणि टी दिलीप यांचाही कार्यकाळ संपला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला नव्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचीही गरज आहे. गौतम गंभीरला आपला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरला तर गोलंदाजीत आर विनय कुमारला आपल्यासोबत ठेवायचे आहे. तर अभिषेक नायर सध्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि त्याने गौतम गंभीरसोबत फ्रँचायझीमध्ये काम केले आहे.
आर विनय कुमार भारतीय संघाचे नवे गोलंदाजी तर अभिषेक नायर फलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतात. वृत्त अहवालावर विश्वास ठेवला तर गंभीरनेही आपली मागणी बीसीसीआयसमोर ठेवली आहे. बीसीसीआय लवकरच कोचिंग स्टाफ सदस्यांसाठी अर्ज मागवणार आहे. 40 वर्षीय विनय कुमार 2014 मध्ये आयसीसी विजेतेपद जिंकणाऱ्या केकेआर संघाचा भाग होता. गौतम गंभीर हा त्या संघाचा कर्णधार होता.
विनय कुमार भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याला 2010 ते 2013 या कालावधीत भारताकडून 1 कसोटी, 31 एकदिवसीय आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. या काळात विनय कुमारच्या नावावर 49 विकेट आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचाही तो एक भाग होता. त्याची देशांतर्गत कारकीर्द चमकदार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने सलग दोन हंगामात रणजी ट्राॅफी जिंकला. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 504 विकेट्स आहेत. तो रणजी इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे.
विनय कुमार यूएइ आयलटी20 मध्ये एम आय एमेरिटसचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. यासह, तो आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट स्काउटचा एक भाग आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, 40 वर्षीय विनय कुमार आयपीएलमध्ये कोची टस्कर्स केरळ, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. 2015 आणि 2017 मध्ये जिंकलेल्या मुंबई संघाचाही तो भाग होता. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
वृत्तानुसार, मुंबईचा माजी फलंदाज अभिषेक नायर भारताचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याच्या मार्गावर आहे. नायर सध्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि त्याने गौतम गंभीरसोबत फ्रँचायझीमध्ये काम केले आहे. अहवालाच्या आधारे, गंभीरला नायर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये हवा होता आणि त्याला बीसीसीआयकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. याआधी, गंभीरला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून हवा होता, अशी बातमी आली होती.
महत्तवाच्या बातम्या-
‘आयपीएलमधून होते 25 कोटी रुपयांची कमाई, तर …’ जाणून घ्या नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची एकूण संपत्ती
काय सांगता, विराट कोहलीच्या तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडची नजर? स्वत:हून म्हणाला…
“प्रत्येक भारतीयाला…”, भारतीय संघाचा हेड कोच होताच, गाैतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया समोर