एकेकाळी पाकिस्तानचे खेळाडू हे स्लेजिंग करण्यामध्ये माहिर होते. समोर कोणताही खेळाडू असला तरीही ते त्याला सोडत नसतं. जावेद मियादाद यामध्ये आघाडीवर असायचे. एक आक्रमक फलंदाज म्हणून गोलंदाजांमध्ये त्यांचा धाक होता. त्याच्या स्वभावाप्रमाणे फलंदाजीतही आक्रमकपणा दिसून यायचा.
जावेद मियादाद यांची क्रिकेटमधील कारकीर्द जबरदस्त राहिली. त्यांनी पाकिस्तानकडून 124 कसोटी आणि 233 वनडे सामने खेळले. कसोटीमध्ये त्यांनी 52.57 च्या सरासरीने 23 शतकांसह 8832 धावा केल्या तर वनडेमध्ये 41.70 च्या सरासरीने 8 शतकांसह 7381 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीच्या सामन्यात तब्बल 80 तर अ दर्जाच्या सामन्यात 13 शतके ठोकली.
जावेद मियांदाद हे मूळचे भारतीय असून ते फाळणीअगोदर गुजरातमध्ये राहायचे. 1947 नंतर त्यांचे कुटुंब कराची येथे शिफ्ट झाले. मियांदाद यांचे वडील गुजरातमध्ये पोलिस म्हणून काम करत होते.
पहिल्या कसोटीत शतक तर तिसऱ्या कसोटीत द्विशतक
जावेद मियादाद यांनी 1976 साली लाहोर येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. लाहोर कसोटीच्या पहिल्याच डावात मियांदाद यांनी 163 धावांची जबरदस्त खेळी करत पदार्पण गाजवले. या सामन्यात सर रिचर्ड हॅडली सारख्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. यासोबतच मियादाद यांनी तिसऱया कसोटी सामन्यात द्विशतक ठोकून इतिहास घडवला. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी द्विशतक ठोकणार ते पहिले खेळाडू बनले.
‘तो’ ऐतिहासिक षटकार
शारजाच्या मैदानावर 1986 साली जावेद मियादाद यांनी असा करारनामा केला की, त्यानंतर ते पाकिस्तानात हिरो झाले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ऑस्ट्रेल-एशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी एका चेंडूत चार धावांची गरज होती. भारताकडून ते शेवटचे षटक चेतन शर्मा टाकत होते. मियादाद यांनी अखेरच्या चेंडूवर ऐतिहासिक षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्यानंतर मियादाद यांना हबीब बँकेत प्रमोशन मिळाले तसेच त्यांना हिऱ्याचे एक ब्रेसलेट मिळाले. याची किंमत 80 हजार डॉलर होती. यासोबतच त्यांना मर्सिडीज कार देखील गिफ्ट म्हणून मिळाली.
त्रिशतक हुकले
1983 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात हैदराबाद येथे कसोटी सामना झाला. या सामन्यात मियांदाद याचे त्रिशतक हुकले. जावेद मियादाद 280 धावांवर असताना इम्रान खान यांनी पाकिस्तानचा डाव घोषित केला. त्यानंतर इम्रान खान आणि जावेद मियांदाद यांच्यातील कायमचे संबंध बिघडले. हीच त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या राहिली.
विश्वचषक विजयात सिंहाचा वाटा
1992 साली पाकिस्तानी संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. या विजयात जावेद मियांदाद यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. मियांदाद यांनी या स्पर्धेत पाकिस्तानकडून खेळताना धडाकेबाज कामगिरी करत 60 च्या सरासरीने 9 सामन्यात 437 धावा ठोकल्या. यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
दाऊद इब्राहिम यांचे नातेवाईक
जावेद मियांदाद हे मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम यांचे नातेवाईक (नात्याने इवाई) आहेत. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार दाऊदच्या मुलीने मियादाद यांच्या मुलासोबत लग्न केले आहे.