भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. योग्य वेळी गडी बाद करण्यात त्यांना अपयश आले. एवढच नव्हे, तर धावा रोखण्यातही ते प्रभावी ठरले नाहीत. आता भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने गोलंदाजांना येणाऱ्या समस्येविषयी भाष्य करताना स्वतःच्या फलंदाजीबद्दलही मत व्यक्त केले आहे.
…गोलंदाजांसाठी ती बाब सोपी नाही -अय्यर
गोलंदाजांना टी20 क्रिकेटमध्ये चार षटके, तर वनडेत 10 षटके गोलंदाजी करावी लागते. त्यामुळे टी20 क्रिकेट खेळल्यानंतर लगेच वनडे क्रिकेट खेळताना त्यांना परिस्थितीशी समतोल साधावा लागतो. याबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “20 षटकांचे सामने खेळल्यानंतर 50 षटकांच्या स्वरूपात स्वतःला जुळवून घेणे फार अवघड आहे. गोलंदाजांना 10 षटके फेकल्यानंतरही 50 षटके क्षेत्ररक्षण करावे लागते. त्यांच्या दृष्टीकोनातून ही सोपी बाब नाही, परंतु ते सकारात्मक मानसिकतेसह पुनरागमन करतील.”
…गोलंदाजांवर आयपीएलमधील परिस्थितीचं होतं ओझं
अय्यरचा असा विश्वास आहे की गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण बहुतेक गोलंदाजांवर आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याचं ओझं होतं.
तो म्हणाला की, “आयपीएलमध्ये गोलंदाजांनी 14 सामने खेळले आणि त्यानंतर ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर क्वारंटाईनमध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे आयपीएलमधील परिस्थिती निश्चितच मनात असते.”
कुकबुरा चेंडूमुळे गोलंदाजांना येत आहे अडचणी
पांढर्या कुकाबुरा चेंडूमुळेही गोलंदाजांवर परिणाम होत आहे का? असे विचारले असता अय्यर म्हणाला की, “नक्कीच. दोन्ही सामन्यांमधील धावसंख्येवर नजर टाकल्यास, या सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा झाल्या. गोलंदाजांना चेंडूंमुळे निश्चितच अडचणी येत आहेत.”
शॉर्ट चेंडूचा सामना करणे मानसिकतेवर अवलंबून
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यात अय्यर शॉर्ट चेंडूवर बाद झाला, याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “हे तुमच्या मानसिकतेशी संबंधित आहे, ज्यात थोडेसे बदल आवश्यक आहे. फलंदाजी करताना खेळपट्टीवर कसे उभे राहायचे यावरही हे अवलंबून आहे.फलंदाजीदरम्यान जास्त वाकण्याऐवजी आपल्याला उभे रहावे लागेल, कारण त्यामुळे शॉर्ट चेंडू खेळणे सोपे होते.”
“मी स्वत: या पद्धतीचे पालन करतो. मी फलंदाजी करताना स्वत:ला थोडा वेळ देतो आणि खेळपट्टीवर टिकून खेळण्याचा प्रयत्न करतो. जर गोलंदाजाने शॉर्ट चेंडूच्या क्षेत्ररक्षणासह गोलंदाजी केली, तर मीदेखील आक्रमक वृत्ती स्वीकारतो.” असेही पुढे बोलताना अय्यर म्हणाला.
दोन विचारांमध्ये अडकून झालो बाद
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अय्यर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या शॉर्ट चेंडूवर बाद झाला होता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की “मला माहित होते की हेझलवूड शॉर्ट बॉल टाकणार आहे. माझ्या मनात दोन गोष्टी चालू होत्या, मी पूल करण्याचा आणि अप्पर कट खेळण्याचा विचार करत होतो. मी दोन विचारांमध्ये अडकलो आणि मला अचूक फटका खेळता आला नाही.”
सरावासाठीच्या खेळपट्ट्या सामन्यातील खेळपट्टीपेक्षा वेगळ्या
युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगदरम्यान खेळपट्टीवर चेंडू अधिक बाउंस होत नव्हता, तर ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर बाउन्स आहे. त्यामुळे अय्यरने वेगवेगळ्या खेळपट्ट्यांशी समतोल जुळवून घेण्याच्या आव्हानावर भाष्य केले. तो म्हणाला की, “ब्लॅकटाउन आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये प्रशिक्षण खेळपट्टीचे स्वरूप सिडनी क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीपेक्षा वेगळे होते. सरावासाठी मिळालेल्या खेळपट्ट्या सामन्यातील खेळपट्टीपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागतो, परंतु हे एक आव्हान आहे. मी या आव्हानाचा आनंद घेत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताकडून वनडेत २०२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू
रवींद्र जडेजाचा ऑस्ट्रेलियामध्ये नवा रेकॉर्ड; ‘या’ दिग्गजांना टाकले मागे
मागील ४ वर्षात या भारतीय क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियामध्ये केले वनडे पदार्पण