आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या हंगामापूर्वी बीसीसीआयने आयपीएलमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे.
आयपीएलच्या 13व्या हंगामात पावर प्लेयरचा समावेश करण्यात येऊ शकतो. तर, आयपीएलच्या हंगामापूर्वी आयपीएलचे संघ विदेशात एकमेकांविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्याचीही शक्यता आहे.
माध्यमातील काही रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Rider) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघांनी बीसीसीआयला सांगितले आहे की या संघांना आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी परदेशात मैत्रीपूर्ण सामने खेळायचे आहेत.
या याजनेला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघानेही समर्थन दाखवले आहे. खरे पाहता, आयपीएल संघांचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत.
संघ परदेशात जाऊन मैत्रीपूर्ण सामने खेळले तर आयपीएलला याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या (IPL Governing Council) बैठकीत चर्चा होईल.
परदेशात मैत्रीपूर्ण सामने खेळण्याची कल्पना मुंबई इंडियन्सने दिली आहे. या कल्पनेमागे आयपीएलची लोकप्रियता वाढावी आणि क्रिकेटसाठी नवीन बाजारपेठ तयार करणे हा उद्देश आहे.
अमेरिकेत गेल्या काही महिन्यांमध्ये टी20 सामने खेळण्यात आले. त्यावेळी सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली होती.






