वर्ष २०२२ चा मार्च महिना (March 2022) क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय खास असणार आहे. कारण या महिन्यात बऱ्याच महत्वपूर्ण क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. मार्च महिन्यात सुरू होणारी सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे, आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC Women World Cup 2022). त्याबरोबरच प्रत्येक भारतीय ज्या लीगची आतुरतेने वाट पाहात असतो, ती जगप्रसिद्ध आयपीएल २०२२ (IPL 2022) ही याच महिन्यात सुरू होणार आहे. या बातमीत आपण, मार्च २०२२ मध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व क्रिकेट सामन्यांबद्दल (Cricket Matches In March 2022) जाणून घेऊया.
सर्वप्रथम मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. ही मालिका ४ मार्चपासून मोहाली येथील पहिल्या कसोटी सामन्याने सुरू होईल. तर उभय संघातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना १२ मार्चला सुरू होऊन १६ मार्च रोजी संपेल. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळला जाणार असून बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
याबरोबरच पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिकाही याच महिन्यात खेळली जाणार आहे. ४ ते ८ मार्च दरम्यान रावळपिंडी येथे उभय संघातील पहिला सामना होणार आहे. त्यानंतर १२ ते १६ मार्चदरम्यान दुसरा सामना कराची आणि २१ ते २५ मार्चदरम्यान तिसरा सामना लाहोर येथे होणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशातील ३ सामन्यांची वनडे मालिका, न्यूझीलंड आणि नेदरलँड संघातील एकमेव टी२० सामना आणि पहिला वनडे सामनाही मार्च महिन्यात होणार आहे.
महिला विश्वचषकही मार्च महिन्यातच
याखेरीज महिला विश्वचषकामध्ये भारतीय संघ त्यांच्या अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार असून हा सामना ६ मार्च २०२२ रोजी माउंट माउंगानुईमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर त्यांची भिडंत यजमान न्यूझीलंडसंगे १० मार्चला होईल. तर विश्वचषकाचे उपांत्य फेरी सामने ३० आणि ३१ मार्च रोजी खेळले जातील. पहिला उपांत्य फेरी सामना वेलिंग्टन येथे आणि दुसरा उपांत्य फेरी सामना ख्राइस्टचर्च येथे होईल. तर अंतिम सामना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला (३ एप्रिल) ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाईल.
आयपीएलच्या १५ व्या हंगामाची होणार सुरुवात
आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे बिगूल वाजले असून या लीगमधील पहिला सामना २६ मार्चला होणार आहे. तर २९ मेपर्यंत ही लीग चालेल. यंदाच्या आयपीएल हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जोपर्यंत १००-२०० चेंडू तो खेळत नाही, तोपर्यंत त्याला झोप येत नाही’, मोहम्मद शमीचा खुलासा
रशियाच्या हल्ल्यावेळी यूक्रेनमध्ये होते पीटरसनचे कुटुंबीय, मग त्यांचे पुढे काय झाले? वाचा सर्वकाही






