क्रिकेट विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा –
१. डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा संघाचा एक प्रतिभावान खेळाडू आहे. यंदा तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळणार आहे. तो एमएस धोनीचा चाहता आहे. त्याने म्हटले आहे की त्याला धोनीप्रमाणेच फिनिशर बनायचे आहे.
२. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने विराट कोहलीनंतर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होऊ शकेल, यावर भाष्य केले आहे. विराटनंतर केएल राहुल हा भारतीय संघाचे नेतृत्व करेल असा विश्वास आकाश चोप्राला आहे. पण त्यासाठी आयपीएलच्या 13 व्या हंगामात राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व कसे करतो, हे पाहावे लागेल.
३. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलची तयारी पाहून आनंदी झाले आहेत. त्यांनी आयपीएल सुरु होण्याआधी सोमवारी युएईच्या शारजाह स्टेडियमला भेट दिली. यावेळी त्यांनी आयपीएळ स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. या भेटीदरम्यानचे फोटोही त्यांनी इंस्टाग्रमवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CFH901CgyZT/?utm_source=ig_embed
४. आयपीएलच्या १३ व्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे एकूण २१ खेळाडू भाग घेणार आहेत. यातील काही खेळाडू सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असेलल्या वनडे मालिकेचा भाग आहेत. त्यामुळे वनडे मालिकेत खेळणारे दोन्ही देशांचे खेळाडू मालिका संपल्यानंतर गुरुवारी युएईला येणार आहेत. तथापि, युएईला पोहोचल्यावर या खेळाडूंना क्वांरटाइनपासून सूट मिळणार नाही आणि त्यांना क्वारंटाइनमध्ये राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे आयपीएलच्या सात संघांवर परिणाम होईल. केवळ गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण त्यांचा कोणताही खेळाडू इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेत खेळत नाही.
५. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्स जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. सध्या तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. त्यामुळे तो संघातील खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाचा सराव करुन घेताना दिसून आला आहे. या दरम्यान, सराव सत्रात ५१ वर्षांच्या अनुभवी ऱ्होड्सने हवेत सूर मारत सुरेख झेल पकडला आणि अनेकांना चकित केले होते. ऱ्होड्सच्या अफलातून झेलचा हा व्हिडीओ फ्रेंचायझीने ट्विटरवर शेअर केला आहे.
६. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी मंगळवारी सांगितले की, स्टीव्ह स्मिथ नेट प्रॅक्टिसमध्ये परत येणार आहे आणि तो इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात खेळेल. हा सामना आज होणार आहे. स्मिथला वनडे मालिकेआधी सराव दरम्यान कोचिंग स्टाफचा एक थ्रो डोक्यावर लागला होता. त्यामुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता.
७. एबी डिविलियर्स हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याच्या क्षमतेमुळे त्याला मिस्टर ३६० असेही म्हणतात. सध्या तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळतो. या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जोस फिलिपमध्ये तो स्वत: ला पाहतो, असे आरसीबीच्या अधिकृत अॅपवर बोलताना सांगितले आहे. मी माझ्या तारुण्यात ज्याप्रकारे खेळत होतो , जोस त्याचप्रमाणे खेळतोय. आमच्या दोघांमध्ये काही समानता आहे असे डिविलियर्स म्हणाला.
८. माजी भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे मंगळवारी (१५ सप्टेंबर) कोल्हापूर येथे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी पहाटे ४ च्या आसपास अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नीव्यतिरिक्त २ मुली आहेत. पाटील यांनी १९५५-५६ दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध केवळ एका सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्यांनी नाबाद १४ धावांची खेळी केली होती. तसेच पाटील यांनी १९५२-६४ दरम्यान महाराष्ट्रासाठी ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह ८६६ धावा केल्या. सोबतच गोलंदाजी करताना ८६ विकेट्सही घेतल्या. त्यांनी रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते.
https://twitter.com/BCCI/status/1305836450085306368
९. भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार (मर्यादीत षटकांचा) रोहित शर्माने सुर्याकुमार यादवबद्दल मोठे विधान केले आहे. काल आपला ३०वा वाढदिवस साजरा करत असलेला सुर्याकुमार यादव लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसेल, असे वक्तव्य रोहितने केले आहे.
१०. आयपीएल 2020 चे अधिकृत प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने रविवारी समालोचन पॅनलच्या नावांची घोषणा केली. दिग्गज क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेसह भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार खेळाडू सुनील गावस्कर, इयान बिशप आणि इतरही मोठे चेहरे यावेळी समालोचन करताना दिसणार आहे. असे असले तरी प्रत्येक आयपीएलमध्ये दिसणारा एक खास चेहरा यावेळी समालोचन करताना दिसणार नाही. तो चेहरा म्हणजे भारताचे माजी क्रिकेटपटू व तेवढेच महान समालोचक संजय मांजरेकर होय. स्टार स्पोर्ट्सने प्रसिद्ध केलेल्या समालोचकांच्या यादीतून मांजरेकरांचे नाव वगळण्यात आले आहे.






