टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन दुलीप ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. ईशान किशन हा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत ‘ड’ संघाचा भाग आहे. ईशान किशन सामन्यातून का बाहेर पडला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण क्रिकबझच्या अहवालानुसार हा डावखुरा खेळाडू दुखापतग्रस्त होऊ शकतो.
ईशान किशनच्या जागी आता संजू सॅमसनला जागा मिळू शकते. संजू सॅमसनचे नाव यापूर्वी घोषित केलेल्या चारपैकी कोणत्याही संघात नव्हते. या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ईशान किशनच्या निवडीलाही ग्रहण लागले असले तरी तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. चारही संघ प्रत्येकी तीन सामने खेळणार असून ‘ड’ टीमचा दुसरा सामना 12 सप्टेंबर रोजी अनंतपूरमध्ये ‘अ’ संघाविरुद्ध होणार आहे.
ईशान किशनने चेन्नई येथे सुरू असलेल्या बुची बाबू स्पर्धेत झारखंडचे राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु त्याचा संघ लीग टप्प्याच्या पुढेच्या फेरीत प्रगती करू शकली नाही. झारखंडने मध्य प्रदेशविरुद्धचा पहिला सामना जिंकला आणि हैदराबादविरुद्धचा दुसरा सामना गमावल्यानंतर संघ बाहेर पडला. पहिल्या सामन्यात ईशान किशनने पहिल्या डावात शतक (114) केले तर दुसऱ्या डावात 41 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या सामन्यात त्याने 01 आणि 05 धावा केल्या.
गेल्या मोसमात ईशान किशनवर निवड समितीने शिस्तभंगाची कारवाई केली होती आणि त्याला केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विरोधात सूचना असूनही ईशानने काही रणजी सामने वगळले होते. किशन आपल्या राज्य संघाकडून खेळला तरच त्याचा राष्ट्रीय निवडीसाठी विचार केला जाईल. अशी माहिती देण्यात आली होती.
बुची बाबू स्पर्धेत भाग घेऊन, ईशान किशनने असे संकेत दिले होते की तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो. मात्र आता दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडल्यानंतर ईशानच्या पुनरागमनावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा-
‘प्रो कबड्डी लीग’च्या नव्या हंगामाची घोषणा, या तारखेपासून अनुभवता येणार थरार!
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
विनेश फोगट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीनं चर्चांना उधाण