टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला बांग्लादेशविरुद्ध चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भलेही एकही बळी घेता आला नसला तरी दुसऱ्या डावात त्याने 3 बळी घेत बांग्लादेशी फलंदाजांना अडचणीत आणण्यास सुरुवात केली आहे. या तीन विकेट्ससह अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लिऑन पहिल्या क्रमांकावर आहे.
आर अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 177 विकेट घेतल्या आहेत. त्याने 36 सामन्यांच्या 69 डावात 20.60 च्या सरासरीने ही विकेट घेतली आहे. या दरम्यान अश्विनने 10 वेळा आपले 5+ विकेट्स मिळवल्या आहेत. या यादीत पॅट कमिन्स 175 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. नॅथन लिऑन 187 विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे. अश्विन आणि लायनमध्ये फक्त 10 विकेट्सचा फरक आहे.
चेन्नईनंतर भारताला बांग्लादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळायची आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडिया तीन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी अश्विनने लायनला मागे टाकून या यादीत पहिले स्थान पटकावण्याची अपेक्षा आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स
नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया) – 187
रविचंद्रन अश्विन (भारत) – 177
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – 175
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 147
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 134
चेन्नई कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या डावात आर अश्विनच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला 376 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. एकवेळ भारताने 144 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अश्विनने जडेजासोबत 7व्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी करून संघाला ही धावसंख्या गाठून दिली.
तर बांग्लादेशचा पहिला डाव केवळ 149 धावांवरच आटोपला. पहिल्या डावानंतर भारताने 227 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी शुबमन गिल आणि रिषभ पंत चमकले. या दोन भावी स्टार खेळाडूंच्या शतकांच्या जोरावर भारताने 287 धावांवर आपला डाव घोषित केला. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ज्याला प्रत्युत्तर म्हणून या बातमी आखेरीस पाहुण्या संघाने 168 धावांवर 4 विकेट गमावल्या आहेत.
हेही वाचा-
चेन्नईचं ठरलं! या 5 खेळाडूंना करणार रिटेन; थाला धोनीबाबत मोठं अपडेट
रिषभ पंतच्या शतकावर ‘खास व्यक्ती’ची प्रतिक्रिया, अवघ्या 3 शब्दात व्यक्त केल्या भावना
Eng vs Aus, चॅम्पियन्स ट्राॅफीपर्वी कांगारुंची ऐतिहासिक कामगिरी; इंग्लंडला लोळवले