सध्या लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’चा 16वा सीझन सुरू आहे. बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन हे या शोचे होस्ट आहेत. या शोमध्ये अनेकदा क्रिकेटशी संबंधीत प्रश्न विचारले जातात. यावेळी क्रिकेटचा एक प्रश्न तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांना विचारण्यात आला. चला तर मग हा प्रश्न काय होता आणि त्याचं उत्तर काय आहे? हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न – 2022 मध्ये कसोटीच्या पहिल्या दिवशी 500 पेक्षा अधिक धावा करणारी पहिली टीम कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी चार पर्याय देण्यात आले होते. हे चार पर्याय होते – भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडनं 2022 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 पेक्षा अधिक धावांचा रेकॉर्ड बनवला होता. या दौऱ्यात एकूण तीन कसोटी सामने खेळले गेले होते. मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे झाला, ज्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं हा रेकॉर्ड केला होता.
रावळपिंडी कसोटीत इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 75 षटकांत 4 गडी गमावून 506 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडनं पहिल्या डावात 657 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पाकिस्ताननं धावांचा पाठलाग करताना 579 धावा केल्या. यानंतर इंग्लंडनं आपल्या दुसऱ्या डावात 264/7 धावा करून डाव घोषित केला. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पकिस्तानची टीम 268 धावांवर ऑलआऊट झाली. अशाप्रकारे इंग्लंडनं हा सामना 74 धावांनी जिंकला. इंग्लंडनं या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 3-0 असा क्लिन स्वीप केला होता.
हेही वाचा –
मुंबई कसोटीपूर्वी या नवख्या खेळाडूला संघात स्थान! रोहितची खेळी की कोच गंभीरचा विश्वास?
INDW vs NZW; मिताली राजसाठी 23 वर्षे लागली, मंधानाने केवळ 11 वर्षात केले हा चमत्कार
चाहत्यांसाठी खुशखबर..! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत!