गेल्या काही वर्षात भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. घरगुती खेळपट्टीवर आणि विदेशी खेळपट्टीवर भारतीय संघ सातत्याने सामने जिंकतो आहे. हा सगळा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. तर, यासाठी भारतीय प्रशिक्षकांनी, मार्गदर्शकांनी अनुभवी खेळाडूंसह अनेक प्रतिभाशाली युवा खेळाडूंना घडवण्याची अहोरात्र मेहनत घेतली आहे. यामुळे कोणत्याही वेळी भारतीय संघ एका वेळेस दोन संघ तयार करुन मैदानावर उतरु शकतो. यामागे एक माणूस भिंतीसारखा उभा राहिला, तो म्हणजे राहुल द्रविड.
भारतीय संघाचा युवा खेळाडू शुभमन गिल याने हल्लीच यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. याबरोबरच त्याने एका मजेशीर प्रश्नाचे अतिशय डोके लावून उत्तर दिले आहे.
गिल म्हणाला की, “गांगुली आणि द्रविड हे दोघेही एक दिग्गज खेळाडू आहेत. ते नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवत आले आहेत. एका युवा खेळाडूसाठी याहून मोठी गोष्ट कुठलीच नसू शकते. अशा दिग्गजांनी कौतुक केल्याने माझ्यासारख्या युवा खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे आपल्याला अजून जास्तीत जास्त चांगल काम करण्याची स्फूर्ती येते.”
“प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहुल सर असे आहेत किते तुम्हाला कधीही तुमची नैसर्गिक खेळी बदलण्यासाठी सांगत नाहीत. राहुल सर नेहमी मानसिकरीत्या खेळाडूला मजबूत बनवत असतात. ते नेहमी खेळाडूंना सांगतात कि, तुम्ही नेहमी तुमच्या खेळाबद्दल विचार करा आणि दबावात तुम्ही त्याचा कसा सामना कराल,” अशा शब्दात गिलने द्रविडची शिकवणही सांगितली.
दरम्यान शुभमन गिलला एक काल्पनिक प्रश्न करण्यात आला. जर तुला राहुल द्रविडने एक सल्ला दिला आणि तोच सल्ला जाऊन तू तुझ्या वडिलांना सांगितला. यावर तुझ्या वडिलांनी सांगितले की, द्रविडने सांगितलेले काहीही करु नको, मी सांगेल तसे कर. यावेळी तू कोणाचे ऐकशील? या प्रश्नाचे हसत उत्तर देताना गिल म्हणाला की, “अशा स्थितीत मी माझ्या मनाचं करीन. मला काय वाटते आहे, यानुसार मी पुढील पाऊल उचलेल.”
शुभमन गिलने आजवर भारतीय संघासाठी ७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३४.४च्या सरासरीने ३७८ धावा केल्या. ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६.३च्या सरासरीने ४९ धावा केल्या आहेत. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो सध्या इंग्लंडला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकात ‘तू चल मी आलो’चा प्रसंग, इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या ४५ धावांवर गुंडाळला होता डाव
इंग्लंडवर १-०ने मात करत न्यूझीलंडचा ‘मोठा’ पराक्रम, २२ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला पूर्णविराम
ब्रॉडने निवडली त्याची ‘ऑलटाईम फेवरेट इलेव्हन’, सचिनसह त्याच्या जिगरी मित्रालाही दिली जागा