स्पोर्ट्समनशिप म्हणजेच खिलाडूवृत्ती. कोणताही खेळ आणि खेळाडू याच खिलाडूवृत्तीने मोठा होतो. त्यातही क्रिकेट म्हणजे तर जेंटलमन्स गेमच. सभ्य माणसांनी खेळायचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले, ज्यावेळी या क्रिकेटपटूंनी असे काही आदर्श घालून दिले जे आजही अनुकरणीय आहेत. अगदी डॉन ब्रॅडमन यांच्यापासून आताच्या केन विलियम्सनपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना स्पोर्ट्समनशिपचे पोस्टर बॉय म्हणता येईल. मात्र, याच खिलाडूवृत्तीने चक्क वर्ल्डकपमधील सेमी फायनलच्या जागेवर पाणी सोडल्याची घटना क्रिकेटविश्वात घडली आहे. काय होती ती घटना आणि कशाप्रकारे तो दिग्गज खेळाडू या प्रसंगामुळे महानतेच्या शिखरावर पोहोचला? त्याचीच ही कहाणी.
इंग्लंड सोडून पहिल्यांदाच भारत-पाकिस्तानात वर्ल्डकप आयोजित केला गेलेला. संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड भारताचा विजयरथ सुसाट सुटलेला. एक दर्जेदार क्रिकेट होत होतं. असात ग्रुप बीमधील मॅच आली. समोरासमोर होते यजमान पाकिस्तान आणि दोन वेळचे विजेते मागच्या वर्ल्डकपचे फायनलिस्ट वेस्ट इंडीज. मॅच होणार होती लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर. वेस्ट इंडीज इंग्लंडविरुद्ध आपली पहिली मॅच हरलेली. या मॅचमध्ये त्यांना कोणत्याही स्थितीत विजय आवश्यक होता. वेस्ट इंडीजचे कॅप्टन विवियन रिचर्ड्स यांनी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
डेस्मंड हेन्स आणि फिल सिमन्स यांनी शानदार सुरुवात केली आणि 91 रन्सची ओपनिंग दिली. मात्र त्यानंतर सलीम जाफर आणि कॅप्टन इम्रान खान यांनी अचानक तख्तापलट केला. कॅप्टन रिचर्ड्स सोडले तर इतर कोणीही टिकाव धरू शकले नाहीत आणि वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 216 रन्सवर आटोपला.
वेस्ट इंडीजचा डाव अपेक्षेपेक्षा लवकर आटोपल्याने पाकिस्तानला विजयाच्या आशा निर्माण झाल्या. मात्र हा गड चढणे सोपे नव्हते, कारण समोर होती दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडीज. त्यांनी आपल्या बॉलिंग अटॅकचा सारा कस दाखवला आणि पाकिस्तानची अवस्था 5 विकेट 110 अशी करून ठेवली. घरच्या प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचे पानिपत होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अशात पिचवर उतरले विकेटकीपर सलीम युसूफ. आता आपला रिषभ पंत जसा निर्भीडपणे खेळतो अगदी तशीच त्यांची त्यावेळी ओळख होती. त्यांनी आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता केली. एक वेगवान फिफ्टी त्यांनी मारली.
पाकिस्तान विजयाकडे मार्गक्रमण करत होता. अशावेळी रिचर्ड्स यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला. नाव कर्टनी वॉल्श. त्यांनी ज्या कामासाठी आपल्याला बोलावलेले ते काम करून दाखवले. आधी इम्रान खान यांना पव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात ते यशस्वी ठरले. पाकिस्तानला जिंकण्यासाठी 15 रन्स हवे असताना 49 बॉलवर 56 रन्स करून खेळत असलेल्या युसूफ यांनाही वॉल्श यांनी आउट करत मॅच रंगतदार बनवली. एक रन बनवत तौसिफ अहमदही रनआऊट झाले. आता मॅचमध्ये चांगलाच ट्विस्ट आलेला.
एक वेळ अगदी सहज विजयाच्या पार जाईल असे वाटत असलेली पाकिस्तान भलतीच अडचणीत आलेली. लास्ट ओव्हरला पाकिस्तानला जिंकण्यासाठी 14 रन्सची गरज आणि हातात होती फक्त एक विकेट. शेवटची ओव्हर टाकायला पुन्हा आले कर्टनी वॉल्श. पाकिस्तानसाठी खेळत होती अब्दुल कादिर आणि सलीम जाफर ही शेवटची जोडी. पहिल्या दोन्ही बॉलवर प्रत्येकी एक रन निघाली. तिसऱ्या बॉलला कादिर दोन रन काढण्यात यशस्वी झाले. आता तीन बॉलमध्ये दहा रन्सची आवश्यकता होती. मॅच जवळपास वेस्ट इंडीजच्या पारड्यात होती. मात्र, कादिर यांनी अचानक गेम बदलली. चक्क वॉल्श यांचा बॉल त्यांनी सिक्स मारला. अचानक समीकरण दोन बॉल चार असं आलं. पाचव्या बॉलवरही दोन रन आल्याने मॅच आता शेवटच्या बॉलवर डिसाईड होणार होती.
स्ट्राइक कादिर यांच्याकडे होती, पण नॉन स्ट्रायकर सलीम जाफर गोंधळलेले. वॉल्श यांनी रनअप घेतला आणि जाफर यांनीदेखील क्रिझ सोडले. जाफर इतके पुढे गेले होते की, वॉल्श हे जाफर यांना सहज मंकडींग पद्धतीने आऊट करू शकत होते. मात्र, त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली आणि जाफर यांना आउट न करता ते फक्त हसून पुन्हा बॉलिंगसाठी तयार झाले. पुढे शेवटच्या बॉलवर कादीर यांनी थर्ड मॅनच्या दिशेने दोन रन काढून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अगदी सहजतेने जाफर यांना रनआउट करून मॅच जिंकण्याची हातात आलेली सुवर्णसंधी, वॉल्श यांनी खिलाडूवृत्तीला सर्वोच्च स्थानावर ठेवत सोडली. हे क्षण पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल जिया उल हक यांच्या मनाला भिडले. त्यांनी हाताने विणलेला कार्पेट वॉल्श यांना भेट दिला.
त्या वर्ल्डकपला एक विजय कमी मिळाल्याने वेस्ट इंडिजची सेमी फायनलची संधी हुकली. सलग चौथ्यांदा वर्ल्डकपची सेमी फायनल खेळण्यापासून वेस्ट इंडिज वंचित राहिलेली. मात्र, त्या एका निर्णयामुळे कर्टनी वॉल्श यांच्या महानतेत आणखीनच भर पडलेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
पत्रकाराच्या ‘त्या’ आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद