आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
भारत, भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय प्रेक्षक हे समीकरण म्हणजे क्रिकेटच्या प्रसिद्धीचे खरे कारण. इंग्रजांनी भारतात आणलेल्या या खेळाचे सर्वाधिक चाहते भारतातच दिसून येतात. विसाव्या शतकाच्या आसपास क्रिकेट खेळण्यास सुरूवात झाल्यावर भारताने जगाला असे काही क्रिकेटपटू दिले, ज्यांचे नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले. कर्नल सीके नायडू आणि मोहम्मद निसार यांचा खेळ पाहण्यासाठी युरोपातील लोकही गर्दी करतात. विजय हजारे व विजय मर्चंट या मुंबईकर जोडीचेही अनेक चाहते होते. नंतरच्या काळात पॉली उम्रीगर, नवाब पतौडी यांनी तर प्रसिद्धीचे अनेक उच्चांक मोडले. क्रिकेट जसे आधुनिकतेकडे म्हणजे एकदिवसीय क्रिकेटकडे वळले, तसे भारतीय क्रिकेटला सुनील गावसकर व कपिल देव यांच्या सारखे सितारे मिळाले. याच, आधुनिक क्रिकेटमधील पहिल्या भारतीय संघातील प्रमुख नाव म्हणजे मोहिंदर अमरनाथ.
दौऱ्याची पार्श्वभूमी आणि अमरनाथ यांचा ‘नवा स्टान्स’
सन 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) या दौऱ्याद्वारे भारतीय संघात चौथ्यांदा पुनरागमन करत होते. अमरनाथ यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्याबरोबर हे नेहमीच घडत असे. ते यायचे, खेळायचे आणि मग थोड्या कालावधीने त्यांना संघाबाहेर बसावे लागायचे. भारताचा संघ या दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळणार होता. पहिल्या तीन कसोटी सामन्यांपैकी दोन सामने अनिर्णित राहिले होते आणि एक वेस्ट इंडीजने जिंकला होता. वेस्ट इंडीजचे वेगवान गोलंदाज यावेळी आग ओकत होते. माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग आणि ऍण्डी रॉबर्ट्स यांनी भारतीय फलंदाजीची त्रेधातिरपीट उडवलेली. हे सर्व उंचेपुरे गोलंदाज, आपल्या अधिकच्या उंचीचा फायदा घेऊन भारतीय फलंदाजांच्या नाकात दम आणत असत. भारतीय फलंदाजांना वेगवान उसळते चेंडू खेळावे लागत होते. या मालिकेपूर्वीच्या काही सामन्यात मोहिंदर अमरनाथ खराब फॉर्म मधून जात होते. वेस्टइंडीज दौऱ्यापूर्वी, त्यांनी आपले वडील लाला अमरनाथ यांच्या मदतीने आपल्या उणिवांवर काम केले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध मोहिंदर अमरनाथ प्रथम फलंदाजीला आले, तेव्हा त्यांची उभे राहण्याची पद्धत बदलली होती. आता त्याचा पवित्रा जरासा खुला झाला होता. ज्याला इंग्रजीत ‘Two Eyed’ स्टान्स असे म्हणतात. लालाजींनी त्यांना असे सांगितले होते की, अशा स्टान्सने उभे राहिल्यास आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्यास मदत होईल.
…आणि दुसऱ्याच सामन्यात ठरले सामनावीर
मालिकेतील दुसऱ्याच कसोटी सामन्यात मोहिंदर अमरनाथ चमकले. पहिल्या डावात 58 धावा व दुसऱ्या डावात शतक करताना, त्यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला. तिसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मालिकेतील चौथ्या सामन्यात जे घडले, त्यावरून मोहिंदर अमरनाथ हे मानसिकदृष्ट्या किती कणखर झाले आहेत, याचा पुरावा मिळाला होता.
ऍण्डी रॉबर्ट्स विरुद्ध भारतीय फलंदाज
अमरनाथ यांनी पहिल्या डावात 91 धावा बनविल्या. त्या डावात भारताचे ते असे एकमेव फलंदाज होते ज्यांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला होता. ऍण्डी रॉबर्ट्स यांनी 16 षटकांत भारताचे 4 गडी बाद केलेले. होल्डिंग यांनी वेंगसरकर आणि गावसकर यांना तंबूची वाट दाखवली होती. वेस्ट इंडिजने आपल्या पहिल्या डावात जोरदार फलंदाजी करत 227 धावांची मोठी आघाडी घेतली. भारत हा सामना निश्चितच हरणार, असे सर्वांना वाटत होते.
… आणि सहा टाके असतानाही अमरनाथ मैदानात उतरले
दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी नोंदवली. सुनील गावसकर वैयक्तिक 19 धावांवर तंबूत परतले. गावसकर परतल्यानंतर, अमरनाथ तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले. अंशुमन गायकवाड यांच्यासमवेत त्यांनी भागीदारी करत, डावाला आकार देण्यास सुरुवात केली. अमरनाथ यांना आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना त्रास होतो, ही गोष्ट जगजाहीर होती. मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या, मायकल होल्डिंग यांनी अमरनाथ यांना जोरदार बाऊन्सर मारला. वेगात आलेला हा चेंडू सरळ येऊन अमरनाथ यांच्या हनुवटीवर लागला. हनुवटी रक्तबंबाळ झाली. अमरनाथ जमिनीवर कोसळले. त्यांना मैदानावरून उचलून, लगेच दवाखान्यात हलवण्यात आले. रक्ताने भरलेला शर्ट घेऊन ते दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी दुखापत पाहत, त्यांच्या हनुवटीवर 6 टाके घातले. दवाखान्यातून येत, अर्ध्या तासात ते पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये हजर झाले.
ड्रेसिंग रूममध्ये बसले असताना, त्या सामन्यातील राखीव खेळाडू असलेले, लक्ष्मण शिवरामकृष्णन त्यांची काळजी घेत, सामन्यात काय घडले याची माहिती पुरवत होते. थोड्याच वेळात, रॉबर्ट्स यांनी बलविंदरसिंग संधू यांना पायचित करून, भारताला पाचवा धक्का दिला. संधू बाद होताच, अमरनाथ फलंदाजीसाठी तयार होऊ लागले. इतर खेळाडूंनी त्यांना ते खेळण्याच्या स्थितीत आहेत का? असे विचारले असता, फक्त मान हलवून होकार देत ते मैदानावर निघून गेले. पायर्या उतरून, अमरनाथ येत आहेत हे पाहिल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. इतक्यात मागून लक्ष्मण शिवरामकृष्णन धावत आले. अमरनाथ खेळण्यासाठी इतके उत्सुक होते की, त्यांनी फलंदाजीसाठी येताना, ऍब्डोमन गार्ड घातलेच नव्हते. तेच देण्यासाठी लक्ष्मण धावत आले होते.
अमरनाथ यांनी 18 धावांवरून आपली खेळी पुन्हा सुरू केली. रॉबर्ट्स यांनी पुन्हा त्यांना आखूड टप्प्याचे चेंडू टाकले मात्र, यावेळी अमरनाथ तयार होते. त्यांनी दुसऱ्याच चेंडूला पुल करत षटकार खेचला. या षटकाराविषयी, अनेक मतमतांतरे आहेत. कारण, त्या सामन्याच्या धावफलकानुसार, भारताच्या दुसऱ्या डावात एकही षटकार मारला गेला नव्हता, तर त्या सामन्याला उपस्थित असलेले चाहते तो षटकार मारला होता, असे सांगतात. यामध्ये एक गोष्ट मात्र खरी होती की, टाके मारून आल्यानंतर, अमरनाथ यांनी प्रत्येक बाऊन्सरवर हूक मारत अनेक धावा वसूल केल्या. अमरनाथ यांची ही झुंजार खेळी 80 धावांवर संपुष्टात आली. भारत दुसऱ्या डावात फक्त एका धावेची आघाडी मिळवू शकला. यामुळे वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी फक्त एक धाव हवी होती जी त्यांनी पहिल्या चेंडूवर घेतली.
अमरनाथ यांची मालिकेतील अविस्मरणीय आकडेवारी
या सामन्यानंतर, मालिकेतील अखेरच्या ऍंटिग्वा कसोटीत पुन्हा अमरनाथ यांची बॅट तळपली. पहिल्या डावात 54, तर दुसऱ्या डावात 116 धावा त्यांनी काढल्या. संपूर्ण मालिकेत अमरनाथ यांच्या नावापुढे 66.44च्या अफलातून सरासरीने 594 धावा लागल्या होत्या. या मालिकेत त्यांनी दोन शतके व चार अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम केला.
या दौऱ्यानंतर अगदी काही महिन्यांनी भारतीय संघाने वेस्ट इंडीजलाच हरवत आपला पहिलावहिला विश्वचषक जिंकला. स्पर्धेतील उपांत्य आणि अंतिम सामन्याचे मानकरी ठरले होते मोहिंदर अमरनाथ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पत्रकाराच्या ‘त्या’ आर्टिकलमुळे सिद्धूंंवर झालेली टीका, पण वर्ल्डकपमध्ये वादळ आणत केली होती बोलती बंद
द्रविडपूर्वी ‘हे’ दिग्गज होते टीम इंडियाची पहिली वॉल, ज्यांना म्हटलं जायचं गावसकरांचा ‘राईट हँड’