जगभरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग म्हणजेच आयपीएल. आयपीएलचा १५ वा हंगाम यावेळी भारतात अन् त्यातही महाराष्ट्रात पार पडणार आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएल २०२२ ला सुरुवात होत आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी बेंगलोर संघात मेंटॉर म्हणून नियुक्त होण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, डिविलियर्सने (AB De Villiers) आपल्या जुन्या आयपीएल फ्रँचायझीसोबत पुन्हा एकदा जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजी खेळाडू डिविलियर्सने आयपीएल स्पर्धेची सुरुवात दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स संघ) या संघासोबत केली होती. त्यानंतर तो सन २०११ साली बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाशी जोडला गेला. बेंगलोर संघाने त्याला ५ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्यापूर्वी डिविलियर्स २०२१ पर्यंत बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व खेळला होता.
डिविलियर्सच्या आयपीएल (IPL 2022) कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने २००८ ते २०२१ दरम्यान १८४ सामने खेळताना ३९.७१ च्या सरासरीने ६१६२ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ४० अर्धशतकेही ठोकली आहेत. आयपीएल स्पर्धेत ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांमध्ये डिविलियर्सचा सहावा क्रमांक लागतो.
माध्यमांतील वृत्तांमध्ये असेही सांगितले जात आहे की, बेंगलोर संघ लवकरच आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाचा खुलासाही करणार आहे. विराट कोहलीनंतर (Virat Kohli) संघाचा नवीन कर्णधार बनण्याच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज फाफ डू प्लेसिस सर्वात पुढे आहे. विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बेंगलोर संघ २०१३ नंतर पहिल्यांदा इतर कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार आहे.
आयपीएल २०२२ मधील बेंगलोर संघाबद्दल बोलायचं झालं, तर बेंगलोर संघ या हंगामाची सुरुवात डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. बेंगलोर संघाला चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स संघासोबत ब गटात ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा
महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया






