भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, भारतीय संघात 18 महिन्यांनंतर पुनरागमन करणारा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केले. तो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याला त्याच्या या खेळीचा जबरदस्त फायदा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये झाला. विशेष म्हणजे, तो यापूर्वी टॉप 100 खेळाडूंच्या यादीतही सामील नव्हता.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यातील पहिल्या डावात 89 आणि दुसऱ्या डावात 46 धावांची खेळी साकारली होती. आता रहाणे कसोटी फलंदाजी क्रमवारीत गरुडझेप घेत थेट 37व्या स्थानी पोहोचला आहे. रहाणेच्या पुनरागमनासह भारतीय संघासाठी पाचव्या क्रमांकावरील फलंदाजाची समस्या दूर झाल्याचे म्हटले जात आहे.
आयसीसीकडून जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यालाही फायदा झाला. त्याने अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावत 6 स्थानांची झेप घेतली आणि 94वे स्थान पटकावले. सध्याच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल 10 खेळाडूंमध्ये भारताकडून फक्त रिषभ पंत याचा समावेश आहे. तो 10व्या स्थानी आहे.
आर अश्विनचा दबदबा कायम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाने अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याला न खेळवण्याचा निर्णय घेतला होता. असे असूनही अश्विन आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. तो सध्या 860 गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर 850 गुणांसह जेम्स अँडरसन दुसऱ्या स्थानी आहे.
अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचाही जलवाद सातत्याने कायम आहे. तो 434 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तसेच, आर अश्विन 352 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (cricketer ajinkya rahane s icc test batting rankings after wtc final 2023 moves to number 37 position)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा