रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना सध्या मुंबई आणि विदर्भात जारी आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या एका मराठमोळ्या गोलंदाजाच्या करिअरचा हा शेवटचा सामना असेल.
35 वर्षीय धवल कुलकर्णीनं रणजी ट्रॉफीच्या मध्यावर देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु संघ व्यवस्थापनाच्या विनंतीवरून त्यानं टूर्नामेंट संपेपर्यंत खेळण्याचं मान्य केलं. काल (10 जानेवारी) अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी विदर्भाच्या फलंदाजीदरम्यान जेव्हा मुंबईचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तेव्हा विलोभनीय दृश्य पाहायला मिळालं. मुंबईच्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटचा शेवटचा सामना खेळल्याबद्दल त्यांचा सहकारी धवल कुलकर्णीला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. मुंबईचे खेळाडू मैदानावर दोन रांगेत उभे होते. कुलकर्णी पॅव्हेलियनमधून बाहेर येऊन मैदानात पोहोचला तेव्हा सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
धवल कुलकर्णी गेल्या 17 वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळतोय. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन चेंडूनं स्विंग आणि अचूकता. त्यानं आपल्या कारकिर्दीत 95 प्रथम श्रेणी सामने खेळले. या कालावधीत त्यानं 27.31 च्या सरासरीनं 281 विकेट्स घेतल्या आहेत. 50 धावांत 7 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
धवल कुलकर्णी भारताकडून 12 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळला आहे. त्यानं 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 19 विकेट्स आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 26.76 आणि इकॉनामी 5.1 एवढी राहिली. धवल कुलकर्णीनं 2016 मध्ये झिम्बाव्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 2 टी 20 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत या दरम्यान त्याची सरासरी 18.33 आणि इकॉनामी 6.88 होती.
धवन कुलकर्णी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लॉयन्सकडून खेळला आहे. आयपीएलच्या 92 सामन्यात त्याच्या नावे 86 विकेट्स आहेत. 14 धावा देऊन 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. तो 2021 मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीची आरसीबीसोबत 16 वर्ष पूर्ण, एक नजर त्याच्या कारकिर्दीवर
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ
IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!