राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. शुक्रवारी (दि. १७ जून) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ८२ धावांनी विजय साकारला. तसेच, ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरीही केली. विशेष म्हणजे, या सामन्याचा शिल्पकार दिनेश कार्तिक ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्तिकने तब्बल १६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले. तसेच, आवेश खान याने फक्त १८ धावा देत ४ विकेट्सची कामगिरी केली. या दोघांच्या जोरावर भारताला यशस्वी विजय मिळवण्यात यश आले. सामन्यानंतर कार्तिकने आपल्या खेळीबद्दल मोठे वक्तव्य केले. चला जाणून घेऊया…
कर्णधाराकडून कार्तिक आणि पंड्याचे कौतुक
सामन्यानंतर कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी तो म्हणाला की, “आम्ही अंमलबजावणीबद्दल बोललो आणि निकाल तुमच्यासमोर आहे.” दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्यातील भागीदारीबद्दल बोलताना पंत म्हणाला, “खरोखर आनंद झाला, दोघांच्या फलंदाजीमुळे गोलंदाजांना दबाव जाणवू लागला होता.”
हार्दिक पंड्याच्या सल्ल्याने बदलला कार्तिकचा खेळ
सामनावीर बनल्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला की, “खूपच भारी वाटत आहे. शेवटच्या सामन्यात गोष्टी चांगल्या नव्हत्या, पण आता मी परिस्थितीचे अधिक चांगल्या पद्धतीने आकलन करू शकलो आहे. ते नियोजन आणि अनुभवातून येते.” कार्तिक म्हणाला, “त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली ज्यामुळे आमचे सलामीवीर खेळू शकले नाहीत. मी फलंदाजीसाठी आलो, तेव्हा हार्दिकने मला क्रीजला चिकटून राहण्यास सांगितले. योजना अंमलात आणणे शानदार आहे.”
हार्दिक पंड्यानेही या सामन्यात टिच्चून फलंदाजी केली. त्याने ३१ चेंडूंचा सामना करताना ४६ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ३ षटकारही लगावले. विशेष म्हणजे, पंड्या आणि कार्तिकने पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारतीय संघ निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६९ धावांचा डोंगर उभा करण्यात यशस्वी झाला.
ही मालिका कोण जिंकतं, याचा निकाल आता येत्या रविवारी (दि. १९ जून) होणाऱ्या पाचव्या टी२० सामन्यातच लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ दोन पठ्ठ्यांनी आफ्रिकेला घाम फोडलाय! चौथ्या सामन्यात केलं धमाकेदार प्रदर्शन
इंग्लंड संघाचा महारेकॉर्ड ! नेदरलँडविरुद्ध केली एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोधी धावसंख्या
भारताचे दमदार पुनरागमन! चौथ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत साधली बरोबरी






