भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद कुणापासूनच लपून राहिला नाहीये. आयपीएल 2023 हंगामात त्यांच्यातील वाद जगासमोर आला होता. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात मे महिन्यात झालेल्या या सामन्यानंतर विराट आणि गंभीरमध्ये मोठा वाद झाला होता. मात्र, त्यांच्यात वाद होण्याची ही पहिली वेळ नव्हती. आयपीएल 2013मध्येही त्यांच्यात बाचाबाची झाली होती. अशात या दोघांच्या वादावर पाकिस्तानातून मोठी प्रतिक्रिया आली आहे.
‘विराटवर जळतो गंभीर’
पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज अहमद शहजाद (Ahmed Shehzad) याने गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्याविषयी खळबळजनक दावा केला आहे. त्याच्या मते, गंभीरने जे काही केले, ते फक्त ईर्षेपोटी. शहजादने एका पॉडकास्टमध्ये म्हटले की, “मी जे काही पाहिले, ते खरंच दु:खद होते. मी समजू शकतो की, अफगाणिस्तानच्या त्या खेळाडू आणि विराट कोहली यांच्यात मैदानावर काय झाले होते. या गोष्टी होतच राहतात, पण जी गोष्ट तुम्ही समजू शकत नाहीयेत, ती ही आहे की, गंभीर आपल्याच देशाच्या खेळाडूला निशाणा का बनवेल, जो सध्या जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे. त्याने विराटविरुद्ध जे इशारे केले, ते योग्य नव्हते.”
पुढे बोलताना शहजाद म्हणाला की, “आयपीएल एक ब्रँड आहे. जर कोणत्याही भारतीय सुपरस्टारला कोणी काही म्हणत असेल, तर याचा अर्थ आहे की, ड्रेसिंग रूममध्ये द्वेष पसरला आहे. तेव्हाच एका खेळाडूला जाऊन चुकीचा व्यवहार करण्याचा आत्मविश्वास मिळतो.”
गंभीरविषयी काय म्हणाला शहजाद?
शहजाद असेही म्हणाला की, “आपण आधीही पाहिले आहे की, गंभीरला कोहलीशी समस्या आहे. मला वाटते की, तो विराटशी जळतो आणि त्याच्यासोबत वाद करण्याची संधी शोधत असतो. मी कधीच कुणाला विराटशी गैरवर्तन करताना पाहिले नाही. तो खेळातील दिग्गज आहे आणि तुम्ही त्याचा सन्मान केला पाहिजे. गंभीरने एकदा त्याचा सामनावीर पुरस्कार विराटसोबत शेअर केला होता. विराटने तुम्हाला विचारले होते का? की, तुम्हाला असे वाटते की, स्वत:चा पुरस्कार त्याला देऊन तुम्ही कायमचे विराटशी गैरवर्तन करण्याचा अधिकार मिळवला आहे?”
गंभीरविषयी बोलताना तो पुढे म्हणाला की, त्याने कधीच कोणत्या सहाय्यक कर्मचाऱ्याला खेळाडूंच्या भांडणात उडी मारताना पाहिले नाही. तो म्हणाला, “मला वाटते की, तो विराटला मिळालेला सन्मान आणि यश पचवू शकला नाहीये. इतक्या कमी वयात त्याने जे काही मिळवले आहे, ते गंभीर उभ्या आयुष्यात मिळवू शकला नाही. जर तू खरंच मोठा खेळाडू आहे, किंवा मोठ्या मनाचा आहे, तर हा तुमचा इशारा असला नाही पाहिजे. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव पाहिजे आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे. मी कधीच व्यवस्थापनातील सदस्याला दोन खेळाडूंच्या भांडणात उडी मारताना पाहिले नाही.”
अहमदची कारकीर्द
अहमदने पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत 153 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 13 कसोटी, 81 वनडे आणि 59 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. कसोटीत त्याने 982 धावा, वनडेत 2605 धावा आणि टी20त 1471 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 3, वनडेत 6 आणि टी20त 1 असे एकूण 10 शतके आहेत. (cricketer gautam gambhir is jealous from virat kohli success says former pak batman)
महत्वाच्या बातम्या-
MPL : अर्रर्र! क्लीन बोल्डचा निर्णयही थर्ड अंपायरलाच द्यावा लागला, पण का ओढवली अशी वेळ?
वर्ल्डकप वेळापत्रकानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली! वाचा नक्की काय घडले?