World Cup 2023मध्ये ‘हा’ फलंदाज करणार सर्वाधिक धावा, दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूची भविष्यवाणी

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी आजी-माजी क्रिकेटपटूंची वक्तव्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. काहीजण स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पोहोचणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी करताना दिसत आहेत. अशात दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिसने भविष्यवाणी केली आहे. कॅलिसने आगामी विश्वचषकात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सर्वाधिक धावा करेल अशी भविष्यवाणी केली आहे. भारतात यावर्षीच 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
जॅक कॅलिस (Jacques Kallis) याने म्हटले आहे की, जोस बटलर (Jos Buttler) आक्रमक फलंदाज आहे. तो भारतीय परिस्थितीत यशस्वी ठरू शकतो. इंग्लंड संघ गतविजेता आहे, ज्यांनी 2019च्या विश्वचषक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला बाऊंड्रीच्या आधारावर किताब जिंकला होता.
काय म्हणाला कॅलिस?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातच विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल. जॅक कॅलिस याला आयसीसीने विचारले की, विश्वचषकात कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करेल? याचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कॅलिस म्हणाला की, “माझ्या मते, जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल. याव्यतिरिक्त मला वाटते की, इंग्लंडसाठी विश्वचषक शानदार ठरेल. मला वाटते की, बटलर हा असा खेळाडू असेल, ज्याच्यावर सर्वांचे लक्ष राहील.”
https://www.instagram.com/reel/CwWs0h0MC0Q/?utm_source=ig_embed&ig_rid=536c5448-c1b2-4c62-b94b-44871a24c6db
बटलरची वनडे कारकीर्द
बटलरच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 165 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये 11 शतके आणि 24 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 4647 धावा केल्या आहेत.
बटलरची भारतातील आकडेवारी
खरं तर, भारतात जोस बटलर याची आकडेवारी खूपच खराब राहिली आहे. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बटलरने भारतात 8 सामने खेळले आहेत. त्यात त्याला 11.85च्या सरासरीने 83 धावाच करता आल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 31 राहिली आहे. बटलरच्या विश्वचषकातील प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 17 सामन्यात 34.84च्या सरासरीने 453 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. (cricketer jacques kallis predicts jos buttler will be the highest run scorer in world cup 2023)
हेही वाचा-
धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूने घेतली त्यांची जागा, World Cupपूर्वी अश्विनचा मोठा दावा
अफगाणी गोलंदाजाने शादाबला धाडलं तंबूत, ‘मंकडिंग’चा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल!