रविवारी (०६ मार्च) भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्याचे आकर्षण असल्याचे सांगितले. असंच काहीसं भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही वाटते. अश्विनचा असा विश्वास आहे की, जडेजाची फलंदाजी काळासोबत आणखी चांगली होत आहे. जडेजाने मोहालीच्या स्टेडिअमवर श्रीलंकेविरुद्ध खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतून अफलातून कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम नाबाद १७५ धावा कुटल्या, तर गोलंदाजी करताना ८७ धावा देत ९ विकेट्सही आपल्या नावावर केले. सामन्यानंतर अश्विनने जडेजाचं कौतुक केले आहे. तसेच त्याने संघातील तिसरा फिरकीपटू जयंत यादवला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काही षटके गोलंदाजी देण्यामागील कारणही सांगितले आहे.
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर अश्विन म्हणाला की, “मला वाटते की, त्याने मागील ४-५ वर्षात ज्याप्रकारे फलंदाजी केला आहे, त्यामुळे तो खरोखर चांगला खेळाडू बनला आहे. तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे, ते माझ्या मते जरा कमीच आहे. त्याची फलंदाजी एक पाऊल पुढे गेली आहे. त्याला माहितीये की, तो काय करत आहे. तसेच, हे ज्याप्रकारे तो फलंदाजी करत आहे, हे त्याचे प्रदर्शन दाखवत आहे.”
जयंत यादवला गोलंदाजी देण्यामागील कारण
जयंत यादवला (Jayant Yadav) गोलंदाजी देण्यामागील कारण सांगताना अश्विन म्हणाला की, “सामन्यादरम्यान आम्हा दोघांनाही समजले की, जयंतने खूप जास्त गोलंदाजी केली नाहीये. तसेच, तो संघातील तिसरा फिरकीपटू आहे. रोहितने त्याला काही षटकेही दिले. कधी-कधी हे इतके सोपे नसते की, संघात तिसरा फिरकीपटू असेल आणि त्याची काळजी घेणे महत्त्वपूर्ण आहे.”
“जडेजाने (Ravindra Jadeja) निर्णय घेतला की, तो आपले काही षटके शेवटी जिथे मदत मिळेल, तिथे टाकेल. त्यानंतर मी माझे शेवटचे षटक सोडले. जडेजाने आपले षटके सोडण्यासाठी खूपच उदार होता,” असेही पुढे बोलताना अश्विन म्हणाला.
अश्विनने पहिल्या डावात ४९ धावा देत २ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ४७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त त्याने फलंदाजी करताना ६१ धावाही केल्या. आपल्या शानदार फलंदाजीबद्दल बोलताना अश्विन म्हणाला की, “माझ्याकडे ४ आठवड्यांचा ब्रेक होता. मला फलंदाजीतून योगदान द्यायचे होते. तसेच, मला सकारात्मक राहायचे होते. मी फलंदाजीवर काम केले. मला आता योगदान देण्याची अपेक्षा आहे.”
विशेष म्हणजे, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या सामन्यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय संघाचा दुसरा गोलंदाज बनला. त्याने ४३४ विकेट्स घेणारे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला. भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने तब्बल ६१९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘रेकॉर्डब्रेक’ कामगिरीनंतर हॉटेलवर जड्डूचे दिमाखदार स्वागत