भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्मास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. हा दिवस- रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक रिषभ पंतने इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात इतर फलंदाज धावांसाठी झगडत असताना, पंतने कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. पंतने भारतीय संघाचे माजी दिग्गज अष्टपैलू आणि कर्णधार कपिल देव यांचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
रिषभ पंतने (Rishabh Pant) अवघ्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान पंतने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. यावेळी पंतचा स्ट्राईक रेट हा १७० पेक्षाही अधिक होता.
यापूर्वी भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा कपिल देव, शार्दुल ठाकूर, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी केला होता. कपिल देव यांनी १९८२ साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना ३० चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले होते. तसेच, शार्दुल ठाकूरने २०२१ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना ३१ चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले होते. याव्यतिरिक्त विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने २००८ साली इंग्लंडविरुद्ध खेळताना ३२ चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकले होते.
एकूण कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानच्या मिस्बाह उल हकने हा कारनामा केला होता. त्याने २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. पंतने
रिषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ३० सामन्यांतील ५१ डावात ४०.८५ च्या सरासरीने १९२० धावा ठोकल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ९ अर्धशतकेही केली आहेत. विशेष म्हणजे, कसोटीत त्याच्या नावावर ४४ षटकार आणि २०५ चौकारांचाही समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे भारतीय फलंदाज
२८ चेंडू*- रिषभ पंत (विरुद्ध श्रीलंका, २०२२)
३० चेंडू- कपिल देव (विरुद्ध पाकिस्तान, १९८२)
३१ चेंडू- शार्दुल ठाकूर (विरुद्ध इंग्लंड, २०२१)
३२ चेंडू- वीरेंद्र सेहवाग (विरुद्ध इंग्लंड, २००८)
३३ चेंडू- हरभजन सिंग (विरुद्ध इंग्लंड, २००२)
महत्त्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! जसप्रीत बुमराहचा मायदेशात डंका; ५ विकेट्स घेत श्रीलंकन फलंदाज धाडलं तंबूत
‘तुझा सार्थ अभिमान’; जसप्रीत बुमराहचा मायदेशात विकेट्सचा पहिला ‘पंचक’, पत्नीने केले रिऍक्ट
‘टोपी सांभाळू शकत नाहीये, संघ कसा सांभाळशील’, रोहित शर्माच्या डोक्यावरून २ वेळा घसरली टोपी