भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यात अफलातून कामगिरी करत विजय मिळवला. तसेच, मालिकाही खिशात घातली. या मालिकेत अफलातून कामगिरी केल्यानंतर रिषभ पंत भलताच चर्चेत आहे. या कसोटी मालिकेत पंतने असे काही प्रदर्शन केले की, त्याला थेट मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. याव्यतिरिक्त पंतने कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात अवघ्या २८ चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. यामुळे तो कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाजही बनला. आता २०२२ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पंत अव्वलस्थानी आला आहे. (Most runs across all formats in 2022, Full-members)
सन २०२२मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा मान रिषभ पंतच्या नावे
सन २०२२मध्ये आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा ठोकण्याच्या बाबतीत रिषभ पंत (Rishabh Pant) अव्वलस्थानी पोहोचला आहे. त्याच्या नावावर एकूण ५७५ धावा आहेत. तसेच, असा कारनामा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १६० धावा ठोकल्या होत्या. ख्वाजाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकूण ५५६ धावा केल्या आहेत.
याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आहे. त्याने मायदेशीत श्रीलंकेविरुद्ध आधी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत आणि नंतर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. आपल्या या सर्वोत्तम कामगिरीनंतर त्याने २०२२ मध्ये आतापर्यंत एकूण ५४९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त ४९२ धावांसह बांगलादेशचा लिटन दास चौथ्या क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेचा पथुम निसानका पाचव्या स्थानी आहे. त्याने ४७३ धावा केल्या आहेत.
सन २०२२मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
५७५* धावा- रिषभ पंत
५५६ धावा- उस्मान ख्वाजा
५४९ धावा- श्रेयस अय्यर
४९२ धावा- लिटन दास
४७३ धावा- पथुम निसानका
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळाल्याने परदेशी लीग खेळायला निघाले ‘हे’ ७ भारतीय, विहारीचाही समावेश
बंगळुरू कसोटीत ‘सामनावीर’ बनलेल्या श्रेयसने सांगितली मनातली गोष्ट, झोपेतही पाहायचा टेस्टचे स्वप्न






