देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा विस्फोटक फलंदाज सरफराज खान सध्या भलताच चर्चेत आहे. नुकतेच बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली. यामध्ये सरफराजला स्थान देण्यात आले नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 42च्या सरासरीने धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाड याला निवडले गेले. मात्र, रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या मागील तीन हंगामात 2466 धावा करणाऱ्या सरफराजकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, अशातच बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्याने सरफराजविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले अधिकारी?
बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर म्हटले की, “अशाप्रकारची नाराजीची प्रतिक्रिया समजू शकतो, पण मी तुम्हाला सांगू शकतो की, सरफराजला सातत्याने दुर्लक्षित करण्यामागील कारण फक्त क्रिकेट नाहीये. असे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे त्याची निवड होत नाहीये.”
त्यांनी विचारले की, “निवडकर्त्यांना कळत नाही का, ते सलग 2 हंगामात 900हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूला का दुर्लक्षित करतील? संघात निवड न होण्यामागील सर्वात मोठे कारण त्याचा फिटनेस आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरासाठी योग्य नाहीये.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “सरफराजला या बाबतीत खूप मेहनत करावी लागेल आणि आपले वजन कमी करून चांगल्या फिटनेससोबत पुनरागमन करावे लागेल. निवडीसाठी फक्त फलंदाजी फिटनेस हे एकमेव मापदंड नाहीये.”
बीसीसीआय (BCCI) अधिकाऱ्यानुसार, फिटनेससोबतच सरफराजचे मैदानात आणि मैदानाबाहेरील वर्तनही शिस्तीच्या मापदंडाप्रमाणे नाहीये. ते म्हणाले की, “मैदानाच्या आत आणि बाहेर त्याचे वर्तन अव्वल दर्जाचे राहिले नाहीये. त्याच्या काही गोष्ट शिस्तीच्या दृष्टीने चांगल्या राहिल्या नाहीयेत. आशा आहे की, सरफराज त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत या गोष्टींवर काम करेल.”
असे म्हटले जात आहे की, यावर्षी दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात दिल्लीविरुद्ध शतक ठोकल्यानंतर सरफराजने आक्रमक पद्धतीने जल्लोष केला होता. त्याचे हे सेलिब्रेशन निवडकर्त्यांना पटले नाही. त्यावेळी निवड समितीचे तत्कालीन प्रमुख चेतन शर्मा स्टेडिअममध्ये उपस्थित होते. त्यापूर्वी 2022च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यादरम्यान त्याच्या वागण्यामुळे मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी दिग्गज चंद्रकांत पंडितही नाराज झाले होते.
सरफराज खान याने त्याच्या कारकीर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 37 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 79.65च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याची ही आकडेवारी नक्कीच उल्लेखनीय आहे, परंतु बीसीसीआय अधिकाऱ्याच्या वक्तव्यानंतर सर्वत्र आता चर्चेला उधाण आले आहे. (cricketer sarfaraz khan have to work on fitness as well as off field discipline selectors not happy with attitude)
महत्वाच्या बातम्या-
वनिंदू हसरंगाचा मोठा विक्रम! वनडेत करून दाखवली आजपर्यंत कुठल्याच स्पिनरला न जमलेली कामगिरी, वाचाच
अनुभवी ईशांतने ‘या’ तीन गोलंदाजांना म्हटले भारताचे भविष्य, कोण आहेत ते नशीबवान?