आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या क्वालिफायर सामन्यांचे आयोजन झिम्बाब्वेमध्ये होत आहे. यामध्ये एकूण 10 संघ भाग घेत आहेत. अ गटातील पहिला सामना रविवारी (दि. 18 जून) झिम्बाब्वे विरुद्ध नेपाळ संघात खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने हरारे सामन्यात नेपाळला 8 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयात कर्णधार क्रेग एर्विन आणि मधल्या फळीतील फलंदाज सीन विलियम्स यांनी मोलाचा वाटा उचलला. दोघांनीही शतक ठोकले. यावेळी विलियम्सने एक मोठा इतिहास रचला. तो झिम्बाब्वेसाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे.
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी नेपाळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 290 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 44.1 षटकात 2 विकेट्स गमावत सहजरीत्या 291 धावा करत विजय मिळवला. या विजयात शतकी खेळीचे योगदान देत सीन विलियम्स (Sean Williams) याने विक्रम केला.
सीन विलियम्सचा विक्रम
सामन्यात चौथ्या स्थानी फलंदाजीला आलेल्या सीन विलियम्स याने 70 चेंडूत नाबाद 102 धावांची शतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 13 चौकारांचा पाऊस पाडला. यासह तो झिम्बाब्वेचा सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने रेजिस चकाब्वा याचा विक्रम मोडीत काढला. त्याने ऑगस्ट 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध 73 चेंडूत वेगवान शतक ठोकले होते. त्याने त्यावेळी 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 102 धावा केल्या होत्या. जिम्बाब्वेसाठी तिसरे सर्वात वेगवान शतक ब्रेंडन टेलर याच्या नावावर आहे. त्याने मार्च 2015मध्ये आयर्लंडविरुद्ध 79 चेंडूत शतक ठोकले होते.
सामन्याविषयी थोडक्यात
क्रेग एर्विन याने 128 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 121 धावा केल्या. सलामीवीर म्हणून उतरलेल्या एर्विनने जॉयलॉर्ड गम्बी (25) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली होती. गम्बी बाद झाल्यानंतर एर्विनने वेस्ले मधेवेरे (32) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. मधेवेरे 24व्या षटकात बाद झाला. तिथून पुढे एर्विन आणि विलियम्स यांनी डाव सावरत नेपाळच्या गोलंदाजांविरुद्ध वादळी फलंदाजी केली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी झाली आणि झिम्बाब्वे संघाने शानदार विजय मिळवला. (cricketer sean williams scored fastest century for zimbabwe in odi cricket)
झिम्बाब्वेसाठी वनडेत सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज (चेडूंनुसार)
70 – सीन विलियम्स विरुद्ध नेपाळ, 2023*
73 – रेजिस चकाब्वा विरुद्ध बांगलादेश, 2022
79 – ब्रेंडन टेलर विरुद्ध आयरलैंड, 2015
महत्वाच्या बातम्या-
आख्ख्या जगाने साजरा केला ‘फादर्स डे’, पण गेलकडून वडिलांना मिळालं सगळ्यात भारी गिफ्ट; एक नजर टाकाच
शेवटी चहलच्या वेदना समोर आल्याच; म्हणाला, ‘माझी फक्त एवढीच इच्छा…’