कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्वच लोकांना आपापल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. भारत सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये १९ दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे हे लॉकडाऊन ३ मेपर्यंत असणार आहे.
या व्हायरसमुळे काही लोकांना ज्याप्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, आता त्याचप्रकारे भारतीय संघाचा गोलंदाज शाहबाझ नदीमलाही (Shahbaz Nadeem) या सर्वांचा सामना करावा लागत आहे. नदीमची पत्नी समन अख्तर आजारी आहे.
त्यामुळे त्याला समनला या व्हायरसमुळे (Corona Virus) उपचारासाठी बाहेर नेता येत नाही. लॉकडाऊनमुळे (Lockdown) तो झारखंडच्या धनबाद (Dhanbad) या आपल्या सासरवाडीमध्ये अडकला आहे. तो येथील ३५० पेक्षा अधिक गरीब परिवारांना जेवणाची मोफत सोय उपलब्ध करून देत आहे.
समन मागील ४-५ महिन्यांपासून लिव्हरवर (यकृत) उपचार करत आहे. यासाठी तिला काही चाचणींसाठी कोलकाताला (Kolkata) जायचे होते. मुजफ्परपूरमध्ये रहाणाऱ्या नदीमचे सासर धनबादच्या जवळ झरिया येथे आहे. येथे त्याच्या पत्नीला आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नदीम म्हणाला की, “पत्नीचे एमआरआयबरोबरच इतर काही चाचण्या करायच्या आहेत. धनबाद येथे चौकशी केली. परंतु आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. बंगाल सरकारशी मदतीसाठी चर्चा केली. परंतु त्यांनीही काही मदत केली नाही. नुकतेच धनबाद जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने कोलकाताला जात असताना झारखंड-पश्चिम बंगाल बॉर्डरवर त्यांना अडविण्यात आले.”
“त्यांना बंगालमध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यांनी पोलिसांना सांंगितले की त्याच्या पत्नीची तब्येत ठीक नाही. परंतु कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही,” असे धनबाद क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव आणि नदीमचे लहानपणीचे प्रशिक्षक एस.ए. रहमान यांनी यावेळी सांगितले.
नदीमने भारतीय संघासाठी केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. तो कसोटीत पदार्पण करणारा अनुभवी आणि २९६वा भारतीय खेळाडू बनला आहे.
कर्णधार विराट कोहलीने मागील वर्षी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी नदीमला संधी दिली होती. या एका कसोटी सामन्याच्या २ डावात नदीमने १०४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
नदीमने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११७ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २८.६६ च्या सरासरीने ४४३ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताचे ३ महान अष्टपैलू, ज्यांनी विकेट व धावा घेऊन दिलेत सामने जिंकून
-५०९९ क्रिकेटपटूंमध्ये अशी कामगिरी करणारा जॅक कॅलिस जगातील एकमेव खेळाडू
-वनडे पदार्पणाच्या सामन्यातच ५ मेडन ओव्हर टाकणारे ५ गोलंदाज