पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक हा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा धनी ठरत आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा वेगळे झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र, खरे काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. सानियापासून वेगळे झाल्याच्या बातम्यांमध्येच आता शोएब मलिकचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये शोएब मलिक लाईव्ह शोमध्ये रडला असल्याचे दिसत आहे. काय आहे त्याचे रडण्याचे कारण? चला जाणून घेऊया…
खरं तर, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शोएब मलिक (Shoaib Malik) हा रडताना दिसत आहे. मात्र, त्याचे रडण्याचे कारण सानिया मिर्झा (Sania Mirza) नाहीये. तो रडण्यामागील कारण 13 वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. विशेष म्हणजे, हे त्याचे आनंदाश्रू होते. काय होती ती गोष्ट, ज्याने शोएबला एवढं भावूक करून टाकलं?
पहिला टी20 विश्वचषक 2007 साली खेळला गेला होता. त्यावेळी पाकिस्तान संघाला पराभूत करत भारतीय संघ विश्वचषक विजेता बनला होता. त्या पराभवाने फक्त पाकिस्तानचे नाही, तर शोएब मलिक याचेही हृदय तोडून टाकले होते. मात्र, दोन वर्षांनंतर पाकिस्तानला जल्लोष करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी इंग्लंडमध्ये टी20 विश्वचषकाचे आयोजन झाले होते. तसेच, युनूस खानच्या नेतृत्वात पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत पहिले विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी मलिकही त्या संघाचा भाग होता. तो लाईव्ह शोमध्ये याच विश्वचषकाच्या विजयाशी संबंधित एक क्षण आठवून भावूक झाला.
तब्बल 13 वर्षे जुन्या गोष्टीला आठवून मलिक भावूक
शोएबने याच शोमध्ये भावूक होण्यामागील संपूर्ण कहाणी सांगितली. त्याने सांगितले की, “जेव्हा आम्ही 2009मध्ये टी20 विश्वचषक विजेते बनलो होतो, त्यावेळी मी नवीन खेळाडू होतो. कर्णधार युनूस खान यांनी मला बोलावले आणि म्हटले की, ट्रॉफी तू उचलशील. ते माझ्यासाठी खूप खास होते.” एका नवीन खेळाडूसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. कर्णधाराचा हा विचार आणि तो क्षण आठवून शोएब भावूक झाला आणि लाईव्ह टीव्ही शोमध्येच त्याला अश्रू अनावर झाले.
टी20 विश्वचषक 2009 स्पर्धेच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर श्रीलंका संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 138 धावा बनवल्या होत्या. यावेळी पाकिस्तान संघाने 2 विकेट्स गमावत हे आव्हान पार केले होते. शोएब मलिक याने त्या सामन्यात 22 चेंडूत 24 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने अंतिम सामन्यात एक षटकही टाकले होते, ज्यामध्ये त्याने 8 धावा दिल्या होत्या.
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तान आणि इंग्लंड संघात रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न येथे अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात कोण विजय मिळवतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (cricketer shoaib malik got emotional in live show amid reports of separation from sania mirza see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलसोबत घडली दुर्दैवी घटना, ‘इतके’ महिने राहणार क्रिकेटपासून दूर
WORLD CUP FINAL: अंतिम सामन्यात इंग्लड ‘टॉस का बॉस’; पाकिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण