भारतात पुढील महिन्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. यानंतर भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबरपासून करणार आहे. मात्र, स्पर्धेला अजून सुरुवातही नाही झाली, तोवर अनेक खेळाडूंनी स्पर्धेचा अंतिम सामना कोणते संघ खेळणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे. यात स्टीव्ह स्मिथ याचाही समावेश आहे.
स्टीव्ह स्मिथची भविष्यवाणी
अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील अंतिम सामना खेळणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी केली होती. त्याने यावेळी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांचं नाव घेतलं होतं. यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानेही अंतिम सामना खेळणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी केली आहे.
स्टीव्ह स्मिथ याने केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. स्मिथ म्हणाला, “मला वाटते की, विश्वचषक 2023चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होईल.” अशात आता यावर चाहते आपली मते मांडत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांना भारत आणि पाकिस्तान संघात वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायला आवडेल.
अहमदाबादमध्ये पहिला सामना
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम मैदानावर विश्वचषकाचा पहिला सामना खेळला जाईल. विशेष म्हणजे, स्पर्धेचा अंतिम सामनाही 19 नोव्हेंबर रोजी याच मैदानावर खेळला जाईल. तसेच, कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामनाही 14 ऑक्टोबर रोजी याच मैदानावर आयोजित केला जाणार आहे.
याव्यतिरिक्त भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध करेल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाईल. तसं पाहिलं, तर या स्पर्धेत भारतीय संघ मागील 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल.
धोनीच्या नेतृत्वात जिंकली अखेरची आयसीसी ट्रॉफी
भारतीय संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात जिंकली होती. अशात आता मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यावर ट्रॉफी जिंकण्याचा दबाव असेल. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा स्पर्धेतील पहिला सामना खूपच रोमांचक असेल. यासाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (cricketer steve smith said world cup 2023 final will be played between india and this team)
हेही वाचाच-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ