मुकेश कुमार आणि तिलक वर्मा यांनी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात भारतीय संघाला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे यजमान वेस्ट इंडिज संघाने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. असे असले, तरीही भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा युवा फलंदाज तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. यासोबतच त्याने सर्वाधिक षटकारही मारले. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
ब्रायन लारा स्टेडिअम (Brian Lara Stadium) येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 या सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) याने पदार्पणात चमकदार कामगिरी केली. त्याने यावेळी वेस्ट इंडिजच्या 150 आव्हानाचा पाठलाग करताना 22 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक 39 धावा चोपल्या. ही खेळी करताना त्याने 2 चौकार आणि 3 षटकारही मारले. या षटकारांसह त्याने एक खास विक्रम करत कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही पछाडले.
तिलकने मोडला रोहितचा विक्रम
झाले असे की, भारताकडून 20 वर्षे किंवा त्याहून कमी वयात एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होता. 2007मध्ये रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 षटकार मारले होते. 2019मध्ये वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने बांगलादेशविरुद्ध 2 षटकार मारून या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र, 3 ऑगस्ट रोजी 3 षटकार मारत तिलकने या दोन भारतीयांना पछाडले.
विंडीजचा 4 धावांनी विजय
गुरुवारी (दि. 03 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 149 धावा केल्या होत्या. यावेळी कर्णधार रोवमन पॉवेल (Rovman Powell) याने सर्वाधिक 48 धावांची खेळी साकारली होती. तसेच, निकोलस पूरन याने 41 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करू शकला. यावेळी भारताकडून तिलकव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव याने 21 धावांचे योगदान दिले होते. (cricketer tilak varma break rohit sharma record of most sixes in an innings at age 20 or less)
महत्त्वाच्या बातम्या-
ना यशस्वी, ना मुकेश; माजी दिग्गजाने ‘या’ खेळाडूला म्हटले भारताचे भविष्य; म्हणाला, ‘भारताला जे पाहिजे, ते…’
विंडीजचा वचपा काढून मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार भारत, वाचा दुसऱ्या टी20विषयी सर्वकाही