ICC Player of the Month Award: आयसीसीने नोव्हेंबर महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी मागील काही दिवसांपूर्वीच 3 खेळाडूंचे नामांकन जाहीर केले होते. यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेश होता. सलामी फलंदाज ट्रेविस हेड आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल ही ती दोन नावे होती. आता आयसीसीने नोव्हेंबर महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे.
ट्रेविस हेड प्लेअर ऑफ द मंथ
ट्रेविस हेड प्लेअर ऑफ द मंथ (Travis Head Player of the Month) असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. हा पुरस्कार जिंकणारा तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी डेविड वॉर्नर (David Warner) याने हा पुरस्कार (नोव्हेंबर 2021) आपल्या नावावर केला होता. अशात, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) या दोन दिग्गजांच्या हाती निराशा लागली आहे.
Travis Head won the ICC player of the month award for November.
– The World Cup hero. ⭐ pic.twitter.com/dEVCUsnHgf
— Johns. (@CricCrazyJohns) December 11, 2023
ट्रेविस हेडचे प्रदर्शन
ऑस्ट्रेलियाचा ‘बिग मॅच प्लेअर’ आणि विश्वचषक 2023 (World Cup 2023) विजेता ट्रेविस हेड (Travis Head) याने आपल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर नोव्हेंबर 2023 (November 2023) महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला. हेडने त्याच्या सहकारी मॅक्सवेल आणि भारताचा वेगवान गोलंदाज शमीला पछाडत हा पुरस्कार जिंकला. एकीकडे, मॅक्सवेलने विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते, तर शमीनेही विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये ट्रेविस हेड याने 220 धावा केल्या, ज्यात 1 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश होता.
ट्रेविस हेड म्हणाला की, तो भाग्यवान आहे की, हाताला दुखापत झाल्यानंतरही ऑस्ट्रेलयियाने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे ही त्याच्यासाठी शानदार संधी होती. तो म्हणाला, “मला वाटले की, विश्वचषकात मी आतापर्यंत जेवढी फलंदाजी केली आहे, ती सर्वोत्तम आहे. त्यामुळे कदाचित प्रत्येक मोठ्या स्पर्धेपूर्वी विश्रांती घेणे महत्त्वाचे असते. हा पुरस्कार जिंकणे एक मोठा सन्मान आहे, पण हा एक संघाचा प्रयत्न आहे.”
उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी
ट्रेविस हेडने आयसीसी वनडे विश्वचषक उपांत्य सामन्यात अर्धशतक केले होते, तर अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शानदार शतक झळकावत आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याला या दोन्ही सामन्यांसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. उपांत्य सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रीच क्लासेन आणि मार्को यान्सेन याची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने 48 चेंडूत आक्रमक 62 धावा केल्या.
अंतिम सामन्यात त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा शानदार झेल पकडला होता, ज्यामुळे रोहितच्या डावाचा अंत झाला. तसेच, सामना इथून बदलला. दुसऱ्या डावात जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ आव्हानाचा पाठलाग करत होता, तेव्हा त्यावेळी 241 धावांचे आव्हान मिळाले होते. यावेळी हेडने 120 चेंडूत 137 धावांची खेळी साकारून ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सने विजय मिळवून देत सहाव्यांदा विश्वचषक किताबावर देशाचे नाव कोरले. (cricketer travis head icc player of the month for november 2023)
हेही वाचा-
‘जाड’ असला तरीही रोहित फिटच, भारतीय फिटनेस कोचचे विधान जिंकेल तुमचेही मन; विराटशी केलीय तुलना
पाकिस्तानची इज्जत चव्हाट्यावर! सीनियर टीम डॉक्टराशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, तर ज्युनियर टीम मॅनेजरशिवाय यूएईत