ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत क्रिकेटच्या मैदानावर दोन हात करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव भलताच फॉर्मात आहे. त्याने आधी ऑस्ट्रेलिया आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20त 33 चेंडूत नाबाद 50 धावा आणि दुसऱ्या टी20त 22 चेंडूत 61 धावा चोपल्या. पाचव्या क्रमांकावर उतरल्यानंतर सूर्यकुमारने ज्या लयीत फलंदाजी केली, त्यामुळे त्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. यामध्ये ‘रन मशीन’ विराट कोहली याचाही समावेश आहे. त्याची एक कमेंट जोरदार व्हायरल होत आहे.
विराटची मराठी कमेंट व्हायरल
भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना 5 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला. या जोरदार फटकेबाजीमुळे त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे भारताकडून दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत (नाबाद 49 धावा) तिसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली. ज्यावेळी सामना संपला, तेव्हा सूर्यकुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला. यानंतर त्याच्यावर चोहो बाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला.
https://www.instagram.com/p/CjOMcc2vXEn/?utm_source=ig_web_copy_link
‘मानला रे भाऊ’
परंतु विराट कोहली याने सूर्यकुमार यादवच्या पोस्टवर केलेल्या मराठी कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. सूर्यकुमारची फलंदाजी पाहून विराटही खुश झाला. विराटने त्याच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “मानला रे भाऊ.” अनेक सेलिब्रिटी असे असतात, ज्यांच्या पोस्टलाही भरभरून लाईक्स मिळत नाहीत. मात्र, यावेळी विराटने केलेल्या कमेंटलाच तब्बल 34 हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला. विराटच्या या कमेंटवर सूर्यानेही रिप्लाय देत “भाऊ,” असे लिहिले. यासोबतच त्याने दोन फायर इमोजीही शेअर केले होते.

सूर्यकुमार 19व्या षटकात तंबूत
सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाच्या नाकी नऊ आणले होते. सूर्यकुमारच्या ताबडतोब फलंदाजीवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, त्याने 15 व्या षटकात कागिसो रबाडा याच्यासारख्या खतरनाक गोलंदाजाविरुद्ध 2 षटकार आणि 2 चौकार चोपले. भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्या मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमार 19व्या षटकात धावबाद होऊन तंबूत परतला. यावेळी भारताने दुसऱ्या टी20त 3 विकेट्स गमावत 237 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. भारताचे हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाला पार करता आले नाही. त्यांनी 3 विकेट्स गमावत 221 धावाच केल्या. त्यामुळे भारताने हा सामना 16 धावांनी खिशात घातला. तसेच, मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेतली.
या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) इंदोरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातही भारतीय फलंदाज धडाकेबाज फलंदाजी करतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या टी-20त भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल! पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन
आता वर्ल्डकपमध्ये भारताचं काही खरं नाय! दिग्गजच म्हणालाय, ‘टीम इंडियात बुमराहसारखा कुणीच नाही’






